श्रीरामपूर येथील रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या नूतन सदस्यांसमवेत स्थानक प्रबंधकांची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी वाणिज्य निरीक्षक ए. जे. देशमुख, वाहतूक निरीक्षक पी. के. ठाकूर, प्रबंधक ए. के. यादव, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रणजित श्रीगोड, विशाल फोपळे उपस्थित होते. नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या हस्ते प्रबंधक ए. के. यादव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
दौड-मनमाड रेल्वे मार्गावर सध्या पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्याने प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. मुंबईकडे जाणारी पुणे-मुंबई शिर्डी फास्ट पॅसेंजर आणि साईनगर पंढरपूर साप्ताहिक रेल्वे गाडी बंद आहे. या गाड्या तातडीने सुरू करण्याची मागणी सर्वानुमते करण्यात आली.
मुंबई येथे दुर्धर आजारावरील उपचाराकरिता हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. शासकीय कामकाजाकरिता या गाड्यांना सर्वसामान्यांची पसंती असते; मात्र रेल्वे गाड्यांअभावी त्यांचे हाल होत आहेत. पंढरपूर रेल्वेला बैठकीचे आरक्षण लागू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी मंजुश्री मुरकुटे, अनिल कुलकर्णी, अमोल कोलते, बन्सी फेरवानी, प्राचार्य गोरख बारहाते यांनी चर्चेत सहभाग नोंदविला. पुढील काळात शहरातील रेल्वे स्थानकाचा विकास होणार असल्याचे आश्वासन रेल्वे अधिकारी देशमुख, ठाकूर, यादव यांनी दिले. अनिल कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विशाल फोपळे यांनी आभार मानले.