शेवगाव : शेवगाव ते मिरीमार्गे पांढरीपूल या रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजूला साईड गटार खोदून रस्ता दुरुस्त करावा, अशा मागणीचे निवेदन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. ए. पालवे यांना देण्यात आले.
यावेळी संजय आंधळे, भुजंग फुंदे, हेमंत पातकळ आदी उपस्थित होते. जि. प. सदस्या हर्षदा काकडे, जगन्नाथ गावडे, देविदास गिऱ्हे, बाळासाहेब पाटेकर, रज्जाकभाई शेख, चंद्रकांत पुंडे, ज्ञानदेव यादव, रवि राशिनकर, सुनील साळवे आदींनी मागणी केली आहे.
रस्त्यावर पाणी येऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत.
काही ठिकाणी तर रस्ता एवढा खराब झालेला आहे की येथे डांबरी रस्ता होता की नाही? अशी शंका निर्माण होते. रस्ता दुरुस्त करताना पुढील नियोजन करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही बाजूला साईड गटार खोदल्यास रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल. रस्त्यालगत असणाऱ्या वस्तीवरील मार्गावर बांधकाम विभागाने स्वखर्चाने पाईप टाकून दिल्यास व पाण्याचा मार्ग मोकळा करणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.