------------------
मावा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
अहमदनगर : भिंगार शहरांमधील अल्पवयीन मुले तसेच वयोवृद्ध पुरुष यांना विषारी मावा खाल्ल्यामुळे कॅन्सर झाला आहे. भिंगारमध्ये दरवर्षी ८ ते १० लोकांना माव्यामुळे जीव गमवावा लागत आहे. राज्य सरकारने बंदी घालून देखील राजरोसपणे भिंगार शहरामध्ये संपूर्ण पानटपऱ्यांवर खुलेआम मावा विक्री चालू आहे. माव्यामध्ये घातक द्रव्य घालून हा मावा कसा जास्तीत जास्त स्ट्राँग होईल याची मावा विक्री करणाऱ्यांमध्ये चडाओढ लागली आहे. अशा टपरीचालकांवर छापे टाकून गुन्हे दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त कार्यालयात स. पा. शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद, शाम वाघस्कर, प्रकाश लुनिया, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, नईम शेख, शहनवाज काझी, दिलनवाज शेख, सागर चाबुकस्वार, विकास चव्हाण, सनी खरारे, सिद्धार्थ आढाव आदींसह नागरिक उपस्थित होते.
------------
नवनाथ विद्यालयात पाठ्यपुस्तकांचे वाटप
अहमदनगर : कोरोना काळात शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांच्या हातात ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट मोबाईल आले. यामुळे पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले; मात्र शाळेत शैक्षणिक वर्षाचे मिळालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या आनंदाने विद्यार्थ्यांचे चेहरे समाधानाने फुलले होते. नुकतेच निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, काशिनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, मंदा साळवे, सुवर्णा जाधव आदी उपस्थित होते.
-------------
शाळा सुरू होण्यासाठी गणपतीसमोर घंटानाद
अहमदनगर : महाराष्ट्रात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने एक पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप करुन पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शैक्षणिक पालकशाही अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये सुरु होण्यासाठी विद्येची देवता विशाल गणपती मंदिरासमोर शनिवारी (दि. १८) घंटानाद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.