पारनेर येथील महाविद्यालय ११ जानेवारीला अंशतः सुरू झाले आहे. त्या ठिकाणी पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील व श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर परिसरातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये अनेक गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहेत. महाविद्यालय सुरू झाले. मात्र, जाण्या-येण्यासाठी साधन नसल्याने, अनेक विद्यार्थी व पालकांची पंचाईत झाली आहे. मुलींचीही कॉलेजमध्ये जाण्यासाठी अडचण झाली आहे. सर्वच मुलांना पालक महाविद्यालयात जाण्यासाठी मोटारसायकल देऊ शकत नाहीत. मोटारसायकल असेल, तरीही दररोज पेट्रोलचा खर्च पेलवणारा नाही. त्यामुळे गरीब व सामान्य विद्यार्थ्यांकरिता गरिबांचा रथ लालपरी सुरू करण्याचा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पारनेर आगाराने विचार करावा, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
....
अद्याप कॉलेज पूर्णतः सुरू केलेले नाही. शास्त्र शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल पूर्ण करण्यासाठी त्यांना कॉलेजमध्ये येण्याबाबत सुचविण्यात आले आहे. मात्र, कॉलेजमध्ये आलेच पाहिजे, अशी सक्ती केलेली नाही. ज्या विद्यार्थ्यांना सध्या कॉलेजमध्ये येणे शक्य नाही. त्यांचे प्रॅक्टिकल कॉलेज सुरळीत चालू झाल्यानंतर घेण्यात येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेस सुरू करण्याची मागणी कॉलेजच्या वतीने पारनेर आगाराकडे करण्यात आली आहे.
-डॉ.रंगनाथ आहेर, प्राचार्य न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर