जामखेड : कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून भाजी बाजार व शनिवारचा आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यांना उपजीविका करणे अवघड झाले आहे. सध्या शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आठवडे बाजार त्वरित सुरू करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
यावेळी आजबे म्हणाले, कष्टकरी, सर्वसामान्य शेतकरी व ज्यांचे हातावर पोट आहे, अशा व्यक्तींसाठी शनिवारचा आठवडे बाजार अत्यंत महत्त्वाचा आहे.
आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा भाजीचा माल अर्ध्या किमतीत व्यापारी खरेदी करतात. जनावरांचीही विक्री होत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे आठवडे बाजार चालू करून शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची मागणी आजबे यांनी केली.
तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले, तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत कोरोनामुक्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागणीची दखल घेऊन संबंधितांची बैठक घेऊन लवकरात लवकर आठवडे बाजार चालू करण्याची ग्वाही दिली.
यावेळी तालुका युवक अध्यक्ष राहुल पवार, माजी सरपंच कृष्णाराजे चव्हाण, जिल्हा परिषद गटप्रमुख ऋषिकेश डुचे, शहराध्यक्ष भाऊसाहेब डोके, उपशहर प्रमुख नितीन जगताप, गावपातळीवरील शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.