अहमदनगर : महापालिकेत उपमहापौरांसह भाजपच्या पदाधिका-यांनी सोमवारी आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. खतनिर्मिती प्रकल्पाची निविदा रद्द करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.महापालिकेच्या खतनिर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. त्यामुळे दुसरा ठेकेदार नेमण्यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा काढताना मेरी संस्थेच्या प्रमाणपत्राची अट आवश्यक होती. मात्र, महापालिकेने ही अट निविदेत टाकली नाही. त्यामुळे ही निविदा चुकीच्या पद्धतीने काढण्यात आली आहे, असा आरोप करीत ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यासह भाजपाच्या पदाधिका-यांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले.या आंदोलनाची दखल घेत महापालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांनी छाननी समितीचा अभिप्राय घेवून ही निविदा रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्त मंगळे यांनी दिले. यावेळी भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवाले, सरचिटणीस किशोर बोरा, गौतम दिक्षीत, नरेंद्र कुलकर्णी, महेश तवले, विश्वनाथ पोंदे, उमेश साठे, श्रीकांत साठे आदी उपस्थित होते.
निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी उपमहापौरांचा नगर महापालिकेत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 2:34 PM