अहमदनगर : जिल्हा परिषदेत नियुक्ती, बदली व बढतीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे व बनावट घटस्फोटांचा फायदा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधातील असंतोष वाढत आहे. यासंदर्भात थेट पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आली असून बनावटगिरीला खतपाणी घालणारे डॉक्टर व कर्मचारी यांचेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेत बदली व पदोन्नतीसाठी दिव्यांग, घटस्फोटित व परितक्त्या प्रमाणपत्राच्या आधारे लाभ मिळतो. त्यामुळे अनेकांनी ही बनावट प्रमाणपत्रे सादर केली आहेत. जे पती-पत्नी एकत्रित राहतात, दररोज सोबत दिसतात त्यांनी न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल करुन घटस्फोटाचा आदेश मिळविला आहे. प्रत्यक्षात ते एकत्रच राहत आहेत. याबाबत सखोल शोध घेण्यासाठी पोलिसांनी असे घटस्फोट दाखल केलेल्या दाम्पत्यांचे कॉल डिटेल्स तपासावेत अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र मिळवितानाही जे कर्मचारी दिव्यांग नाहीत त्यांनीही जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना हाताशी धरुन ४० टक्के दिव्यांग असल्याची प्रमाणपत्रे घेतली आहेत. हा मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. यात लाखो रुपयांची उलाढाल झाली असण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात शासकीय डॉक्टरही सहभागी असल्याची चर्चा आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी अशी मोठ्या प्रमाणावर खोटी प्रमाणपत्रे सादर करण्यात आली आहेत. याबाबतही तक्रारीत उल्लेख आहे.घटस्फोटीत महिला सासरकडील नियुक्ती घेतातज्या महिलांनी घटस्फोट घेतले त्या महिला बदलीसाठी किंवा नियुक्तीसाठी माहेरऐवजी पती राहत असलेल्या परिसरातील गावे निवडत आहेत. पोलिसांना दिलेल्या निवेदनात याही बाबीकडे लक्ष वेधण्यात आले आहे.न्यायालयासमोरही आव्हानघटस्फोटाची प्रकरणे न्यायालयात दाखल होतात. मात्र न्यायालयाला खोटी कहाणी सांगून काही दाम्पत्य घटस्फोटाचे आदेश मिळवत आहेत. ही न्यायालयाचीही दिशाभूल आहे. न्यायालयीन आदेशांचा गैरफायदा घेतला गेला असल्याने न्यायालयानेच याबाबत स्वतंत्र तपासणी समिती नियुक्त करुन आजवर घटस्फोटाची मागणी केलेल्या अर्जांमध्ये तथ्य होते का? याचा शोध घेण्याची गरज आहे असे मत कर्मचारी व्यक्त करत आहेत. काही संघटना याबाबत न्यायालयाकडेही मागणी करणार आहेत.फसवणुकीत महिलाही सहभागीजिल्हा परिषदेत अनेक महिलांनी देखील दिव्यांग व घटस्फोटीत असल्याची अवास्तव प्रमाणपत्रे सादर केली आहेत. महिला बालकल्याण विभागात कार्यरत असणाऱ्या दिव्यांग महिला ससून अथवा परजिल्ह्यातील वैद्यकीय पथकांमार्फत आपल्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यास टाळाटाळ करत आहेत. प्रशासनाने आदेश देऊनही या महिलांनी पडताळणी केलेली प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत.
शिक्षकांची ससूनमध्ये तपासणीसामाजिक कार्यकर्ते विजय शिरसाठ यांच्या तक्रारीवरुन पदोन्नती घेतलेल्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची ससूनमध्ये तपासणी सुरु आहे. शिरसाठ यांच्या उपस्थितीत डॉक्टर ही तपासणी करत आहेत. या तपासणीला अनेक शिक्षक गैरहजर राहत असल्याचे शिरसाठ यांचे म्हणणे आहे. अनेकांची दिव्यांगत्वाची टक्केवारी अवास्तव असल्याचे या तपासणीत पुढे येत आहे.