अहमदनगर : ‘सातवा वेतन आयोग मंजूर करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, निवृत्तीचे वय ६० करावे आदी मागण्यांसाठी सरकारी कर्मचा-यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. डिसेंबरअखेर मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा कर्मचा-यांनी दिला.गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचा-यांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. या मागण्यांची दखल घ्यावी म्हणून राज्य सरकारी नोकर संयुक्त संघाच्या नगर शाखेतर्फे सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. ‘सातवा वेतन आयोग मंजूर करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, निवृत्तीचे वय ६० करावे, पाच दिवसांचा आठवडा करा, केंद्राप्रमाणे महिलांना बाल संगोपन रजा मिळाव्यात, कर्मचा-यांच्या रिक्त जागा त्वरित भरा, थकीत महागाई भत्ता मिळावा आदी मागण्यांच्या घोषणा देत कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष बी. बी. सिनारे, कार्याध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, पी. डी. कोळपकर, विलास पेद्राम, राजपत्रित अधिकारी संघटनेचे महेश घोडके, विठ्ठलराव गुंजाळ यांनी आपल्या भाषणात शासनाच्या वेळकाढू धोरणावर टीका केली. डिसेंबरअखेर मागन्या मान्य न झाल्यास त्यानंतर राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कर्मचा-यांनी दिला.
सातव्या वेतन आयोगासाठी नगरमध्ये शासकीय कर्मचा-यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 3:24 PM