शिर्डी : शिर्डीत साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे़ डेंग्यूमुळे दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला़ शगुफ्ता अहमदभाई कुरेशी असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या अकाली मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.दहावीच्या वर्गात शिकत असलेली शगुफ्ता हिस ताप येत असल्याने तिला संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी नेले होते़ मात्र बेड शिल्लक नसल्याने सलाईन घेऊन तिला पुन्हा घरी पाठविण्यात आले़ कॉट रिकामी झाल्यावर अॅडमीट करुन घेतले, मात्र सोमवारी रात्रीच्या वेळी अचानक ताप वाढल्याने तिला अतिदक्षता विभागात दाखल केल़े तेथे उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालवली.शिर्डीत गेल्या महिन्याभरापासून साथींच्या आजाराने थैमान घातले आहे. गोचीड ताप, थंडी-ताप, मलेरिया, पांढऱ्या पेशी कमी होण्याचे प्रमाण आदी आजारामुळे प्रत्येक घराघरात रुग्ण दिसत आहे. शिर्डीतील साईनाथ रुग्णालय, साईबाबा रुग्णालय, खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मोठी गर्दी दिसते. रक्त, लघवी तपासणीसाठी सर्वच लॅबवर रांगा लागल्या आहेत़ साई संस्थानच्या रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. या गर्दीमुळे शगुफ्ताला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत़ ही मुलगी गरीब कुटुंबातील असून शाळेत अत्यंत गुणी होती़ निधनाची वार्ता समजताच शाळेतील विद्यार्थिनींनी अक्षरश: आक्रोश केला़ येथील कब्रस्थानमध्ये तिचा दफन विधी करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक रमेश गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ गोंदकर यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
डेंग्यूच्या आजाराने विद्यार्थिनीचा मृत्यू
By admin | Published: August 24, 2016 12:17 AM