अहमदनगर: श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात राहणाऱ्या तरुणाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या संबंधित दुजोरा दिलेला नाही. तसेच ग्रामीण रुग्णालयाने शहर व तालुक्यातील ६३ रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी नगरला पाठविले आहेत. त्यातील सहा रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे या तपासणीमध्ये आढळून आले आहे.
डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अनिल उर्फ दादू मारुती पवार (वय ३२) असं असून प्रथम लोणी व त्यानंतर एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र मारुती पवार यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. यासंदर्भात पालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पऱ्हे यांच्याशी संपर्क केला असता याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नसल्याचे त्यांनी लोकतमशी बोलताना सांगितले. मात्र शहरातून अनेक रुग्णांचे रक्ताचे नमुने ग्रामीण रुग्णालयाने तपासणीसाठी पुणे येथील संस्थेकडे पाठविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहरात खासगी रुग्णालयांमध्ये औषधोपचार घेणाऱ्या सहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याने ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्याचप्रमाणे डेंग्यूची लागण प्रामुख्याने लहान मुलांना झाल्याचे आढळून आले आहे. शहरातील रुग्णांनी खासगी रुग्णालयात औषधोपचार घेतल्यानंतर ते सध्या घरी विश्रांती घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती डॉ.राजेंद्र सांगळे यांनी दिली. संबंधित रुग्णांच्या घरी वैद्यकीय पथकाने भेट देऊन साठवलेले पाणी फेकून देत प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये याकरिता नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्येही रुग्णांना भरती करण्याची व्यवस्था आहे. रुग्णांनी भिती बाळगण्याचे कारण नाही. भरपूर पाणी प्यावे तसेच विश्रांती घ्यावी असेही डॉ.सांगळे यांनी म्हटले आहे.