-----------
सुदाम देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : पहिल्या लाटेनंतर कोरोनाच्या विषाणूनेही आपले स्वरूप बदलले होते. आता डेंग्यूचही तसेच झाले आहे. डेंग्यूच्या विषाणूनेही आपले स्वरूप बदलले आहे. अंगात ताप नसतानाही डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याची उदाहरणे समोर येत आहेत, अशी केवळ चर्चाच आहे. डेंग्यू पॉझिटिव्ह आहे आणि लक्षणे नाहीत, असे रुग्ण नगर जिल्ह्यात तरी आढळून आलेले नाहीत. तसेच शासकीय स्तरावरही याबाबत कोणतीही माहिती नाही. विषाणू बदला तरी नागरिकांनी स्वच्छता, सकस आहाराचे सेवन आणि आराम करण्यावर भर द्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात साथरोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. आधीच कोरोना, त्यात आणखी साथरोगांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेलाही चिंता लागली आहे. पावसामुळे शहर व जिल्ह्यात सगळीकडेच अस्वच्छता आहे. पाण्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होते. परिणामी डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. गत दोन महिन्यांत जिल्ह्यात ७० ते ८० रुग्ण आढळून आले आहेत, असे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे, तर सर्व खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. डेंग्यूची चाचणी होत नाही. ताप आणि लक्षणे आढळली की उपचार सुरू होतात. खासगी रुग्णालयात लहान मुलांसह मोठ्या रुग्णांचे प्रमाण खूप आहे. केवळ चाचणी होत नसल्याने शासकीय आकडेवारीमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी दिसते आहे.
विषाणू हा नेहमीच बदलत असतो.“डेंग्यूचा विषाणू बदलला आहे, त्यामुळे वेगळ्या काही तरी उपाययोजना करा’, असे कोणतेही आदेश अद्यापपर्यंत तरी यंत्रणेला मिळालेले नाहीत, असे येथील हिवताप विभागाच्या सूत्रांनी सांगितले. नागरिकांनीच काळजी घ्यावी. स्वच्छता ठेवावी. सकस आहार घ्यावा. व्यायाम आणि आराम करून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात येत आहे.
-----------
रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवा
गत दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातलेले आहे. सर्दी, ताप, खोकला असे आजार बळावलेले आहेत. काही लोकांना अशी कोणतीही लक्षणे नसताना ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहेत. डेंग्यूबाबतही आता तसेच घडत आहे. ताप नसतानाही काही लोक डेंग्यू पॉझिटिव्ह येत आहेत, असे केवळ बोलले जात आहे. रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असली तरी डेंग्यूत त्रास ठरलेलाच असतो. डेंग्यू आहे आणि त्रास काहीच नाही, असा नगर शहरात तरी एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे येथील खासगी डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. डेंग्यूचा विषाणू बदलतोय, ही केवळ नागरिकांमध्येच चर्चा आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
---------------
घाबरू नका, काळजी घ्या
डेंग्यूचा विषाणू हा नेहमीच बदलत असतो. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली ते पॉझिटिव्ह आले तरी सात दिवसांत बरे होतात. जास्तीत जास्त २१ दिवस उपचार घेऊन ते ठणठणीत होतात. मागील काही दिवसांत मृत्युदर कमी झालेला आहे. विषाणू बदलला आहे, असे अद्याप तरी अधिकृत काहीही आलेले नाही. परंतु, नागरिकांनी घाबरू नये. कोणतीही औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केलेले आहे.
-----------
जिल्ह्यातील डेंग्यूचे रुग्ण
जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतचे रुग्ण - ६९
सप्टेंबरमध्ये आढळलेले रुग्ण - १७
नमुने घेतलेले रुग्ण - १५०
सर्वाधिक रुग्ण असलेला परिसर - अहमदनगर शहर
------------
डेंग्यूचे तीन स्तर
३ ते ५ दिवस - ताप
५ ते ८ दिवस - पेशी कमी होणे
८ ते १२ दिवस - तब्येत पूर्ववत (रिकव्हरी फेज)