अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या क्लिपप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीचे कामकाज सोमवार (दि. २३)पासून सुरू होणार असून समितीसमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीला देवरेही यांच्यासह कोण-कोण अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची स्वत:च्या आवाजातील ११ मिनिटांची क्लिप शुक्रवारी समाज माध्यमांवर प्रसारित झाली. या क्लिपमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यावर आरोप करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. देवरे यांनी महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. क्लिप प्रसारित झाल्यानंतर महिला आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तीन सदस्यांची समिती नियुक्त केली. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ या समितीच्या अध्यक्षा असून उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व तहसीलदार वैशाली आव्हाड या समितीच्या सदस्या आहेत. तहसीलदार देवरे यांना होणाऱ्या प्रशासकीय व मानसिक त्रासाची चौकशी करावी, असे या समितीला आदेश दिलेले आहेत. तसेच तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेला आहे.
दरम्यान, २० ऑगस्टला रात्री याबाबतचा आदेश दिल्यानंतर शनिवारी व रविवारी सार्वजनिक सुट्टी होती. त्यामुळे आता सोमवारी (दि. २३) या विषयावर सुनावणी होणार असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा तथा उपजिल्हाधिकारी निर्मळ यांनी दिली. मात्र या सुनावणीसाठी कोणाला पाचारण केले आहे, त्याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, या सुनावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात देवरे उपस्थित राहतील, असे समजते.
--