अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या स्थानिक चौकशी समितीसमोर आपले म्हणणे मांडले नाही. राज्यस्तरीय स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त व्हावी, अशी मागणी त्यांचेसह तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सोमवारी सायंकाळी केली.
देवरे यांची गत शुक्रवारी आत्महत्येचा इशारा देणारी क्लिप समाजमाध्यमांतून प्रसारित झाली होती. या क्लिपमधील तक्रारीच्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली. देवरे यांना प्रशासकीय आणि मानसिक त्रासाबद्दल चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी या समितीला दिला होता. या समितीची सोमवारी सुनावणी होती. देवरे यांच्या तक्रारीत उल्लेख असलेल्या १८ जणांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांनी आपले म्हणणे सादर केले. मूळ तक्रारदार असलेल्या तहसीलदार देवरे या मात्र सुनावणीसाठी गैरहजर राहिल्या. त्यांच्यासह पारनेरचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा उंदरे, वैद्यकीय अधिकारी श्रद्धा आडसूळ, वाहनाचा चालक आबा औटी असे पाच जण चौकशी समितीसमोर हजर झाले नाहीत, अशी माहिती चौकशी समितीच्या प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली. वाघ, डॉ. उंदरे हे आजारपणामुळे येऊ शकले नाहीत तर आडसूळ यांनी यापूर्वी दिलेले निवेदन समितीकडे सादर केले होते. तेच ग्राह्य धरण्याची त्यांनी समितीकडे विनंती केली. देवरे दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात होत्या. मात्र चौकशी समितीसमोर त्यांनी म्हणणे मांडले नाही. स्थानिक समितीवर दबाव असण्याची शक्यता असल्याने राज्यस्तरीय समिती नेमावी, असे त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
--------------------
तहसीलदार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना सोमवारी सायंकाळी निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यासह नऊ तहसीलदार उपस्थित होते. महिला अधिकारी म्हणून काम करताना देवरे यांची कुचंबना, अवहेलना होत आहे. वरिष्ठांकडून चुकीच्या पद्धतीने चौकशी सुरू आहे, खोट्या तक्रारी व कारवाईचा धाक दाखवून कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, लोकप्रतिनिधींच्या मर्जीने कामे न केल्यामुळे वरिष्ठांवर दबाव टाकून चौकशी व कारवाईचे प्रस्ताव पाठविल्याचे दिसून आले आहे. यामुळे महिला अधिकाऱ्याचे करिअर संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे राज्यस्तरावर महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती तत्काळ स्थापन करून पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
----------
माझ्यावर दबाव: चालक
माझा पाच दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यात मी जखमी झालो. मात्र मला तहसीलदार देवरे यांनी मारहाण केल्याबाबत तक्रार दाखल करावी म्हणून राहुल झावरे व बाळासाहेब कावरे या दोघांनी मला रविवारी रात्री त्यांच्या कार्यालयात बोलावून घेत तक्रार अर्जावर सही करण्यासाठी दबाव आणला. मात्र मी त्या अर्जावर सही केली नाही, अशी प्रतिक्रिया देवरे यांच्या वाहनाचे चालक आबा औटी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, राहुल झावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना हा आरोप फेटाळला. आपण औटी यांना संपर्क केलेला नाही. हवेतर चौकशी करावी. ते खोटी माहिती देत आहेत असे ते म्हणाले.
--------------
जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या मुद्यांच्या आधारे विभागीय आयुक्तांकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला आहे, त्यात माझ्यावर प्रशासकीय कामकाजाबाबत आरोप आहेत. त्याला मी कागदपत्रांच्या आधारे प्रशासकीय, तांत्रिक पद्धतीने उत्तरे देणार आहे. काम करताना काही चुका होतात. अनेक आरोपांपैकी रांजणगाव मशीद येथील वाळू साठ्याचा लिलाव जाहीर केला होता. मात्र प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार हा साठा शासकीय कामासाठी राखीव ठेवायचा होता. मात्र आधीच लिलाव जाहीर केल्याने तांत्रिक पद्धतीने सदरचा लिलाव रद्द करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले. यामध्ये शासनाचा महसूल बुडाल्याचा संबंध कुठेच येत नाही.
-ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर
----------
‘ती’ क्लिप भावाने पत्रकाराला दिली-देवरे
एखाद्या महिला अधिकाऱ्याला एवढा त्रास होत असेल तर तो असह्य आहे. अशा त्रासामुळे माझा माझ्यावरील ताबा सुटला होता. त्यामुो मी ही क्लिप तयार केली. मात्र क्लिप तयार करतानाच पुन्हा सावरले. ही क्लिप माझ्या भावाने एका पत्रकार मित्राकडे दिली आणि नंतर ही क्लिप समाज माध्यमांवर प्रसारित झाली. मी ती प्रसारित केली नाही. माझ्या एका तहसीलदार मैत्रिणीने मला राज्य महिला आयोगाच्या अनिता पाटील यांच्याशी संपर्क करून दिला. त्यांनी दिलेल्या मानसिक आधारामुळे मी सावरले, असे तहसीलदार देवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.