संयुक्त कामगिरीमुळे शेतकऱ्यांचा फायदा
राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण देशातील शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या आठ पिकांच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना आत्तापर्यंत १ लाख कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. दरवर्षी विद्यापीठ विकसित वाणांपासून सहा हजार कोटींचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. यापुढे कृषी विभाग, कृषी विद्यापीठे आणि महाबीज यांनी एकत्र येऊन कृषी माल विपणनावर काम करणे गरजेचे आहे, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामासाठीच्या विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठकीचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते. याप्रसंगी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावाल, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक शरद गडाख, अधिष्ठाता (कृषी) अशोक फरांदे, कृषी परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक विठ्ठल शिर्के उपस्थित होते.
कृषी आयुक्त धीरज कुमार म्हणाले, यावर्षी पावसाचा चांगला अनुमान आहे. या पावसाचा फायदा घेण्यासाठी कृषी विज्ञान व तंत्रज्ञान याची जोड देणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची जमीनधारणा कमी होत आहे. शेती फायदेशीर करायची असेल तर पीक निविष्ठांवरील खर्च कमी करणे, छोट्या शेतकऱ्यांना परवडेल, अशा यंत्र सामुग्रीची निर्मिती करणे गरजेचे आहे.
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावाल म्हणाले, आंतर संस्थात्मक सहभागावर भर दिल्यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांच्या बिजोत्पादनात वाढ होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. याप्रसंगी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक शरद गडाख यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वाण व शिफारशी आणि विस्तार उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी मिलिंद देशमुख, पंकज पाटील, अजय कुचे यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, कोल्हापूरचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी विभागीय खरीप अहवालाचे सादरीकरण केले. स्वागत पंडित खर्डे यांनी केले. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. आभार गोकुळ वामन यांनी मानले.