भाविकांच्या वर्दळीच्या ठिकाणी व मंदिर परिसरालगत हे भिक्षेकरी भाविकांच्या आसपास घोटाळून, केविलवाणे तोंड करून भिक्षा मागत असतात, अनेदा भाविक भिक्षा देत नाही तोवर ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. यातील काही भिक्षेकरी नशेतही असतात. गेल्या महिन्यातच साई मंदिर खुले झाले असले तरी कोविडचा धोका अद्याप संपलेला नाही. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिसांना शिर्डीतील भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस, नगरपंचायत व साई संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी ३३ पुरुष व १२ महिला भिक्षेकऱ्यांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. या सर्वांना राहाता न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने पुरुष भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर, तालुका श्रीगोंदा तर महिला भिक्षेकऱ्यांची रवानगी चेंबूर, मुंबई येथे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सायंकाळी पोलीस पथके या भिक्षेकऱ्यांना घेऊन रवाना झाल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.
कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक दीपाली काळे, उपअधीक्षक संजय सातव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, साहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले, मिथुन घुगे, प्रवीण दातरे यांनी पार पाडली.