अहमदनगर : महाविकास आघाडीत छोटा भाऊ-मोठा भाऊ यावरून वाद सुरू आहेत. हे वाद भाजपद्वारे लावले जात आहेत, असा आरोप केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यात काहीही घडलं तरी त्यात आमचाच हात आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्यात आमचाच हात आहे असा कृपया आरोप करू नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सुनावले.
देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामधील वादावर बोलताना फडणवीस म्हणाले, दोघांमधील वाद एका पेल्यातील वाद आहे. तो आता थांबलेला आहे. तो किरकोळ वाद होता. मी दोघांमध्ये मध्यस्थी घडवून आणली आहे. त्यामुळे तो वाद पूर्णपणे मिटलेला आहे. नाना पटोले, संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत. त्यांना काही काम नाही. आम्हाला भरपूर काम आहेत. त्यांच्या आरोपांना मी उत्तर देत नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. शिवसेना व भाजप या दोघांमध्ये कोणतेही वाद नाहीत. आमच्यामध्ये पूर्ण समन्वय आहे. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत आम्ही दोघं बसून निर्णय घेऊ. नगर जिल्ह्यातील जलजीवन घोटाळ्याबाबत मला पूर्ण माहिती नाही. तरीपण आम्ही त्याची माहिती घेऊन चौकशी करू, असे फडणवीस यांनी सांगितले.