संगमनेर : महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चाला प्रचंड गर्दी होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चावर जी काही टीकाटिपण्णी केली. त्यांच्या पद्धतीने त्यांनी मोर्चा कसा नॅनो होता, हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्या मूलभूत प्रश्नांवर मोर्चा काढण्यात आला. त्याला कुठेही त्यांनी स्पर्श केला नाही. त्यामुळे टीका करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मूलभूत प्रश्नांची उत्तरे दिली असती तर ते योग्य झाले असते. अशी प्रतिटीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.१८) मतदान होत आहे. काँग्रेस नेते, माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या जोर्वे गावात मतदान केले. त्यांच्या पत्नी कांचन थोरात, मुलगी जयश्री थोरात यांनीही मतदान केले. त्यानंतर आमदार थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य मी ऐकले. सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलतात, महाराष्ट्राची अवहेलना करतात. त्यावर फडणवीस हे एक शब्दही बोलले नाहीत. महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य भारतीय जनता पक्षाकडून होतात. आपले प्रकल्प गुजरातला गेले. महागाई, बेरोजगारी त्यावर देखील ते बोललेले नाही. महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेला महामोर्चा प्रचंड होता, तो लोकांनी, सर्वांनी पाहिला. मोर्चाला उत्स्फूर्तपणे लोक आलेले होते. असेही आमदार थोरात म्हणाले.