अहमदनगर : शहराच्या पाणी पुरवठा फेज टू योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला, तर उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेवून अमृत योजनेच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी फेरनिविदा काढण्याची गळ घातली.शहर सुधारित पाणी पुरवठा योजनेमधील अडथळे दूर करण्यासाठी महापौर सुरेखा कदम याच रस्त्यावर उतरल्या. जलवाहिनी टाकण्यासाठी ज्यांच्या शेतामध्ये अडथळे आले होते, त्या शेतकऱ्यांशी महापौरांनी चर्चा केली. अडथळे दूर झाल्यास तीन महिन्यांमध्ये जलवाहिन्या टाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत ठेकेदारालाही बजावण्यात आले आहे.शहर सुधारित पाणी पुरवठा योजनेच्या फेज टू योजनेतील अडथळे असलेल्या ठिकाणांची महापौर सुरेखा कदम यांनी मंगळवारी सायंकाळी पाहणी केली. त्यांच्यासमवेत आयुक्त दिलीप गावडे, स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव, नगरसेवक अनिल बोरुडे, महेश तवले यांच्यासह शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, सुरेश तिवारी, संपत नलावडे, शरद ठाणगे, नितीन बारस्कर आदी उपस्थित होते. अभियंता परिमल निकम, महादेव काकडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.अमृत योजनेसाठी निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर सर्वांत कमी वाढीव दराची निविदा मे. तापी प्रिस्टेस प्रा. लि. यांची असल्याने त्यांनाच काम देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र या ठेकेदार कंपनीने ‘फेज टू’ योजनेचे वाटोळे केले असल्याने त्यांना काळ््या यादीत टाकून अमृत या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी फेरनिविदा काढण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. दिवाळी झाल्यानंतर अमृत योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे छिंदम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.केंद्र-राज्य शासनाच्या निधीमधून अमृत या महत्त्वांकाक्षी योजनेमधून शहराच्या पाणीपुरवठा विषयक कामांसाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. मात्र ‘फेज टू’ योजनेचे वाटोळे करणाऱ्या मे. तापी या कंपनीनेच अमृतसाठी सर्वांत कमी वाढीव दराची निविदा दाखल केली. त्यामुळे तांत्रिक व प्रशासकीय मुद्द्यावर याच ठेकेदार कंपनीला काम देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. मात्र कंपनीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन काम देण्याबाबत निविदेत शब्द नमूद करण्यात आलेला आहे. ‘फेज टू’चा पूर्वानुभव लक्षात घेता या कंपनीला अमृतचे काम देऊ नये. राबविण्यात येत असलेली निविदाप्रक्रिया रद्द करावी, आणि फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी छिंदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निविदाप्रक्रिया रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे छिंदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मुळानगर येथील नवीन पंप बसविणे, जलवाहिनी टाकण्यासाठी येणारे अडथळे याबाबत महापौरांनी मुळानगर ते विळद पंपिंग स्टेशन ते शहराकडे येणाऱ्या शेतामध्ये जलवाहिन्या टाकण्याबाबत असलेल्या आक्षेपांबाबत संबंधित शेतकरी, जमीनमालकांशी चर्चा केली. जलवाहिनी टाकण्याबाबतच्या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाजूंबाबत ठेकेदार अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. जलवाहिन्या अंथरण्याबाबतचे अडथळे दूर केल्यास तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याबाबत ठेकेदारांनी संमती दर्शविली असे, महापौर कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
उपमहापौर मुख्यमंत्र्यांच्या दारी
By admin | Published: October 26, 2016 12:31 AM