मुंढे यांच्या पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध नुकताच लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच संबंधित तीन पोलीस कर्मचारी पसार झाले आहेत. लाचलुचपतच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. उपअधीक्षक मुंढे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी वसंत फुलमाळी, संदिप चव्हाण व कैलास पवार यांनी ७ एप्रिल रोजी वाळू वाहतूक करताना एक ट्रक पकडला होता. तो ट्रक कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली होती. यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. लाचलुचपत विभागाने केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमूद तिन्ही पोलिसांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर या तिघांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हे तिघे कर्मचारी उपअधीक्षक मुंढे यांच्या पथकातील असल्याने त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांची चौकशी केली आहे. या गुन्ह्यातील फरार तिघांना अटक केल्यानंतरच तपासाला गती मिळणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक श्याम पवरे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांची लाचलुचपतकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:21 AM