मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही शाळा परिसरात अवैध व्यवसाय; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

By अरुण वाघमोडे | Published: October 18, 2023 06:45 PM2023-10-18T18:45:10+5:302023-10-18T18:45:34+5:30

सीताराम सारडा विद्यालयाजवळ असलेल्या पानटपरीबाबत मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी तक्रार केल्यावरून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.

Despite Chief Minister's attention, illegal business in school premises Congress's warning of agitation | मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही शाळा परिसरात अवैध व्यवसाय; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही शाळा परिसरात अवैध व्यवसाय; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

अहमदनगर: सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन दोन आठवडे होत नाही तोच पुन्हा शाळेच्या आवारात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू झाल्याने शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शाळा परिसर तंबाखूमुक्त करून मुलांना खुल्या वातावरणात श्वास घेऊ द्या, अशी मागणी केली. 

शहरातील सीताराम सारडा विद्यालयाजवळ असलेल्या पानटपरीबाबत मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी तक्रार केल्यावरून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली होती. या घटनेनंतर प्रशासनाने सदर टपरी हटविली मात्र, विद्यालयाच्या १०० मीटर अंतरावर तेच पान स्टॉल एका गाळ्यात सुरू झाले आहे. या गाळ्याचा व्हिडिओ काळे यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना दाखविला. शहरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकांचे भवितव्य मटका, बिंगो, जुगार, तंबाखू, गुटखा, मावा अशा व्यसनाभोवती अडकविले जात आहे.

यामुळे पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. कुणालाही आपले पाल्य हे व्यसनाधीन, जुगारी व्ह्यावेत असे वाटत नाही. याबाबत पोलीस, मनपा तसेच अन्न व औषध विभाग परस्परांकडे बोट दाखवीत असून कोणीही यावर सक्षमपणे कारवाई करण्यास तयार नाही. याबाबत पुढील ४८ तासांच्या आत कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. कारवाई न झाल्यास येत्या सोमवारी पालकमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने ढोल बाजाओ आंदोलन करण्यात येईल. तरीही प्रश्न सुटला नाही तर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर मुंबई येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच कारवाई होईपर्यंत नगरमध्ये शिक्षण मंत्र्यांना फिरू दिले जाणार नाही. असा ईशारा यावेळी काळे यांनी दिला.

Web Title: Despite Chief Minister's attention, illegal business in school premises Congress's warning of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.