अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दीड कोटी रुपये खर्चून अर्सेनिक अल्बम गोळ्यांची खरेदी केली. मात्र, महिना लोटला तरी या गोळ्या अद्याप पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीत गोण्यातच पडून आहेत. कोरोनावर लस आली तरी प्रत्यक्ष ग्रामस्थांपर्यंत या गोळ्यांचा डोस पोहोचला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शासनाने जिल्हा परिषदेमार्फत या गोळ्यांचे वाटप करण्याचे नियोजन जून २०२० मध्येच केले होते. परंतु या प्रक्रियेची तांत्रिक मंजुरी, निविदा यात सहा महिने विलंब झाला. तोपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग ओसरला होता. दरम्यान, जिल्हा परिषदेने निविदा काढून २७ नोव्हेंबर २०२० रोजी पुण्यातील एका फार्मसी कंपनीला गोळ्यांचा पुरवठा करण्यात सांगितले. जिल्ह्यातील ३८ लाख ४२ हजार लोकांना प्रत्येकी एक डबी याप्रमाणे कंपनीने डिसेंबरमध्ये या गोळ्यांचा पुरवठा प्रत्येक पंचायत समितीला केला; परंतु महिना लोटला तरी या गोळ्या पंचायत समितीत, तर काही ग्रामपंचायतीत पडून आहेत. शेवगाव तालुक्यात तर या गोळ्यांचे पाणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने घाईघाईत तेथील वाटप थांबविले.
दरम्यान, या गोळ्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या का? याबाबत लोकमत प्रतिनिधींनी जिल्ह्यातील काही गावांत चौकशी केली असता, अद्याप या गोळ्या आल्या नसल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपूर्वी वाटप करणे गरजेच्या असलेल्या या गोळ्यांसाठी जिल्हा परिषदेने एक तर एवढा उशीर केला आणि आता कोरोनावर लस येऊन त्याचे लसीकरणही सुरू होईल तरी या गोळ्या लोकांपर्यंत गेल्या नाहीत. त्यामुळे या जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराची ग्रामस्थांकडून खिल्ली उडवली जात आहे.
-------------
कर्जतमध्ये गोण्या स्वागत कक्षात पडून
कर्जत तालुक्यातील नागरिकांना वाटप करण्यासाठी दिलेल्या गोळ्यांच्या गोण्या कर्जत पंचायत समितीच्या स्वागत कक्षात पडून आहेत. कर्जत तालुक्यासाठी किती गोळ्या आल्या, त्यांचे किती गावात वाटप केले? याबाबत कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, दोन दिवस कार्यालयाला सुट्टी आहे. याबाबत सोमवारी माहिती मिळेल.
------------
गोळ्यांत पाणी निघाल्यानंतर शेवगावमध्ये खबरदारी
शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे अर्सेनिक गोळ्यांमध्ये पाणी झाल्याचे उघड झाल्याने येथील प्रशासन मोठी खबरदारी घेऊन पावले टाकत आहे. पंचायत समितीतून सर्व ग्रामपंचायतींना वाटप झाल्याचे सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार यांनी सांगितले. मठाचीवाडी, एरंडगाव, लखमापुरी, आदी ग्रामपंचायतच्या सरपंच व नागरिकांना विचारले असता गोळ्या वाटप झाल्याचे त्यांनी सांगितले.
-------------
नगर तालुक्यातील बहुतांशी गावे वंचित
नगर तालुक्यात सव्वातीन लाख गोळ्या आल्या. त्या ग्रामसेवकांमार्फत सर्व गावांत पाठवून वाटपाच्या सूचना दिल्याचे गटविकास अधिकारी सचिन धाडगे यांनी सांगितले. मात्र, कुठल्याही गोळ्या अद्याप आलेल्या नाहीत. ग्रामपंचायतीने स्वत: चार-पाच महिन्यापूर्वी त्या वाटप केल्या आहेत, असे हिंगणगावचे सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले. हिवरेझरे येथील ग्रामस्थ नारायण रोडे यांनीही अशा कोणत्याही गोळ्या अद्याप मिळाल्या नसल्याचे सांगितले.
---------------------
राहात्यातील ५० गावांत होणार वाटप
राहाता तालुक्यात दोन लाख ८६ हजार ८७ गोळ्या ५० गावांसाठी आल्या असून, त्या ग्रामपंचायतीकडे पाठविल्या असल्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले. आतापर्यंत ग्रामपंचायतमार्फत कोणत्याही गोळ्या मिळाल्या नसल्याचे कदीर कादर शहा यांनी सांगितले.
-----------------
कोपरगावात वाटपाची प्रक्रिया सुरू
कोपरगाव तालुक्यातील ७९ गावांत दोन लाख ३८ हजार डब्यांचे घरोघरी वाटप करण्यात येत आहे. तशी वाटपाला प्रत्यक्षात सुरुवातदेखील करण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी दिली, तर दुसरीकडे गोळ्यांचे अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत वाटप झालेले नाही अथवा तशी माहितीदेखील दिली गेलेली नाही, अशी प्रतिक्रिया खोपडी येथील ग्रामस्थ संजय त्रिभुवन व चासनळी येथील कैलास चांदगुडे यांनी सांगितले.
----------------
फोटो - ०९कर्जत अर्सेनिक
कर्जत तालुक्यातील पंचायत समितीच्या स्वागत कक्षात गोण्यांमध्ये लागलेली अर्सेनिक गोळ्यांची थप्पी.