सन्मतीवाणी
प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार भोग भोगावेच लागतात. प्रत्येकाचे भाग्य वेगवेगळे असते. परंतु जो संघर्ष करुन परिस्थितीवर मात करतो तो एक प्रकारचा पराक्रम समजला पाहिजे. म्हणून पराक्रमाने प्रत्येक जण नियतीला सुध्दा बदलू शकतो. धर्म आराधनेत असाच पराक्रम करा म्हणजे ध्येयपूर्तीकडे वाटचाल करता येते हेच महावीर कथेद्वारे स्पष्ट होते. सत्पुरुष हे दयेचे सागर करुणाकर असतात ते वात्सल्य भावनेने सम्यकवृत्ती ठेवून सर्वांवर ममता करतात. सतपुरुषांची वाणी कधीही असत्य नसते. भाग्य हे नशीबाने बदलत नाही तर त्याकरीता चांगली कर्म करण्याची आवश्यकता असते. जी व्यक्ती चांगल्या कर्माने स्वत:चे भाग्य बदलते तीच पुरुषार्थ करणारी ठरते. महापुरुष आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्व प्राणी मात्रांचा उध्दार व्हावा, ते पापमुक्त व्हावेत या हेतूने करतात. गुरुच्या आचार विचारानुसार वागणे हे साधकाचे काम आहे. गुरुची परीक्षा साधकाला घेता येत नाही. गुरुचा कधीही अपमान करु नये. महापुरुषांच्या संगतीत जीवनाला नवीन दिशा प्राप्त होते. तीर्थकर बनण्याकरीता भगवान महावीरांनी किती यातना सहन केल्या, किती संकटांचा सामना केला याचे वर्णन महावीर कथेद्वारे कळते. गुरु हे आपले आधार असतात. अंतिम काळ चांगला जावा या करीता चांगले कर्म करा. धर्मसाधना करण्याचा प्रयत्न करावा. सदविचार करा, संत संगती करा, जीवन सफल होईल.- पू. श्री. सन्मती महाराज