लोकमत न्यूज नेटवर्क
कोतूळ : अकोले बस आगाराच्या मनमानी कारभाराचा फटका कोतूळ परिसरातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शालेय वेळेत अकोले येथे पोहोचणाऱ्या व परत येणाऱ्या बस महामंडळाने बंद केल्याने पंचवीस महाविद्यालयीन मुलींना शिक्षणाला मुकावे लागले आहे.
अकोले तालुक्यातील राजकीय अनास्था आणि मुजोर प्रशासकीय यंत्रणेचा आणखी एक नमुना समोर आला आहे.
कोतूळ शहरालगत सात गावातील कला, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक प्रशिक्षण तसेच कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक शाळेत कोतूळ ते अकोले, संगमनेर येथे जाण्यासाठी दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. महाविद्यालये भरण्याची वेळ सकाळी साडेसात व सुटण्याची दुपारी अकरा ते बारा दरम्यान आहे. मात्र गेल्या तीन महिन्यापासून अकोले आगाराने कोतूळ येथून सकाळी साडेसहा ते सात दरम्यान सुटणाऱ्या दोन बस बंद केल्या. यापैकी एक याच वेळेस बस धामणगावपाट येथून सुरू केली. तर महाविद्यालय सुटल्यावर बारा ते दीड दरम्यानच्या बस बंद केल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे या वेळेत खासगी अवैध वाहतूक जोमात चालत आहे. कोतूळ व परिसरातील विद्यार्थ्यांना सध्या कोतूळातून पहाटे साडेपाच वाजता धामणगावपाट येथे बस मिळण्यासाठी पायपीट करावी लागते. तर आसपासच्या खेड्यापाड्यातील पालक मुलींना दुचाकीने पोहाेचवतात. परंतु बसच नसल्याने अनेक अल्पवयीन मुलांच्या हाती पालकांना दुचाकी द्यावी लागत आहे. किमान पंचवीस विद्यार्थिनींना पहाटेचा प्रवास करावा लागतो. साडेसात वाजता मुली महाविद्यालयात पोहोचतात. तोपर्यंत किमान दोन तास संपलेले असतात. त्यामुळे अनेकांना एसटीच्या भरवशावर शिक्षणाला मुकावे लागते आहे.
....
कोतूळ-अकोले सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यानच्या नाशिक व बदगी अकोले बस बंद आहेत. धामणगावपाट येथून सकाळी साडेसहाला अकोले बस जाते. त्यामुळे मुलींना पहाटे साडेपाचला दुचाकीने आम्ही पालक धामणगावपाटला जातो. बस जाईपर्यंत थांबावे लागते. काहींना सोय नसल्याने शाळेत जाता येत नाही, हे धोक्याचे आहे. तरी कोतूळातून पूर्वीप्रमाणे बस सेवा सुरु करावी.
-
दिगंबर जाधव, पालक, कोतूळ.
...
सध्या शाळा व्यवस्थापनाची वेळापत्रके सतत बदलत आहेत. विद्यार्थ्यांनी एसटी पास देखील कमी प्रमाणात घेतल्याने कोणत्या ठिकाणी किती विद्यार्थी आहेत हे लक्षात येत नाही. शाळेच्या वेळा निश्चित नाहीत. कोतूळ मोठे गाव असल्याने लवकरच विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करू.
-ज्ञानेश्वर आव्हाड, आगार प्रमुख, अकोले.