देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील तरुणांनी कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकी जपताना रक्तदान शिबिराचे आयोजन करून १०५ रक्त पिशव्यांचे संकलन केले.
सध्याच्या कोरोना संकट काळात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा काळात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून येथील वसुंधरा फाऊंडेशन, जाणता राजा प्रतिष्ठान व जनकल्याण रक्तपेढी, अहमदनगर यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराचे उद्घाटन उद्योजक शंकर पाडळे, उद्योजक अतुल लोखंडे, माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, उद्योजक अशोक वाखारे, दीपक वाघमारे, नीलेश गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. प्रथम रक्तदान रवींद्र ढवळे यांनी केले.
बेलवंडी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे, सहाय्यक फौजदार मधुकर सुरवसे, पोलीस शिपाई संदीप दिवटे, रामदास भांडवलकर यांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. डॉ. वसंत झेंडे, सोनाली खांडरे, स्मिता बडवे, विनिता धामणगावकर, सुलभा पवळ, गयाबाई चव्हाण, मोहन शर्मा, विमल लोखंडे, किशोर यादव यांनी रक्त संकलनाची जबाबदारी सांभाळली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वसुंधरा फाऊंडेशन व जाणता राजा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.