अहमदनगर : किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार ही पाचच नाही तर पुढील १५ वर्षे सत्तेत राहणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना मात्र अजूनही सत्तेची आशा आहे. परंतु त्यांना आशेवरच राहावे लागेल, असा टोला अहमदनगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाला लगावला. अहमदनगर येथे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘महाविकास आघाडीचे सरकार सहा महिन्यांत पडेल’ असे फडणवीस व चंद्रकांत पाटील म्हणतात, असे पत्रकारांनी मुश्रीफ यांना विचारले असता, त्यांनी भाजपचा समाचार घेतला. फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना भाजपचेच सरकार येणार अशी पूर्ण खात्री होती. परंतु त्यांचा भ्रमनिराश झाला. त्यामुळे आताही त्यांच्या डोक्यात रात्रं-दिवस सत्तेचेच गुºहाळ फिरत असते. त्यातून ते अशी विधाने करतात. परंतु भापजला आमचे सांगणे आहे की, महाविकास आघाडीचे सरकार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे हे सरकार पुढील १५ वर्षे टिकणार आहे, असा दावा मुश्रीफ यांनी केला.सरपंच निवडीबाबत येत्या अधिवेशनात कायदा भाजप सरकारच्या काळातील थेट जनतेतून सरपंच निवड रद्द करून महाविकास आघाडी सरकारने सरपंच निवड सदस्यातून करण्याचा निर्णय घेतला. याचा अध्यादेश काढण्याची विनंती सरकारने राज्यपालांकडे केली होती. परंतु राज्यपालांनी ही मागणी फेटाळली, याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांना पत्रकारांनी विचारले असता, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरपंच निवडीबाबत आम्ही कायदाच करणार आहोत. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघेल, असे त्यांनी सांगितले. विखेही आमच्याकडे येतीलपत्रकार परिषदेत मुश्रीफ यांच्या बाजूलाच खासदार सुजय विखे हेही बसले होते. ‘आमचे सरकार पुढील १५ वर्षे टिकेल व त्यात विखेही असतील. कारण तेही मूळचे काँग्रेसी विचारधारेचेच आहेत’, असे मुश्रीफ यांनी सांगताच एकच हशा पिकला. या विधानाने सुजय विखे यांनाही हसू आवरले नाही.
'पुढची 15 वर्षं सत्ता आमचीच, विखेही परत येतील'; हे ऐकून सुजय विखेही हसले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 5:49 PM