अहमदनगर : मंत्रिपदाचा वापर करुन आजवरचा कर्जत-जामखेडचा विकासाचा अनुशेष आपण भरुन काढण्याचा प्रयत्न केला. लवकरच तालुक्यात सहकारी साखर कारखानाही काढणार आहोत. सत्ता आपण जनतेसाठी वापरली. त्यामुळेच कर्जत-जामखेडची सामान्य जनता आपल्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी तालुक्यात झालेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यांच्याशी झालेली बातचीत...
प्रश्न: तुम्ही या निवडणुकीकडे कसे बघता?- गत पाच वर्षात मी मंत्री म्हणून मतदारसंघात विकासाची अनेक कामे केली. मतदारसंघात शासकीय कृषी महाविद्यालय आणले. जलयुक्त शिवारची कामे केली. यावर्षी पाऊस कमी झाला. अन्यथा त्याचे फलित लगेच दिसले असते. रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले. काही रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. ती लवकरच पूर्ण होतील. सूतगिरणीला मंजुरी मिळाली आहे. यातून एक हजार तरुणांना रोजगार मिळेल. तरुणांसाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेतल्या. कर्जतचा पाणी प्रश्न सोडविला. या मतदारसंघाचा गत पन्नास वर्षाचा अनुशेष सत्तेच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रश्न: मुख्यमंत्री रोहित पवारांना ‘बारामतीचे पार्सल’ म्हणतात- हो खरे आहे ते. माझ्याविरोधात राष्ट्रवादीला स्थानिक उमेदवार मिळाला नाही. म्हणून त्यांना उमेदवार आयात करावा लागला आहे. कारखाना आणि त्यांच्या शिक्षण संस्थांचे कर्मचारी येथे येऊन राजकीय सर्वे करतात. आमच्या मतदारसंघात एकमेव सहकारी साखर कारखाना होता. तो अवसायानात काढला. तो कुणी विकत घेतला हे सर्वांना माहित आहे. सहकार मोडीत काढून हे स्वत:चे कारखाने काढताहेत. जनता हे ओळखून आहे. आमच्या मतदारसंघातील निवडणुकांमध्ये ‘कॉर्पोरेट’ संस्कृती नव्हती. हे आज ज्या पद्धतीने प्रचारात दिखावा करत आहेत ते आमच्यासारख्या सामान्य उमेदवारांना परवडणारे नाही. यातून राजकीय संस्कृतीच बदलण्याचा धोका आहे. त्यामुळे हे पार्सल परत पाठवा हे मुख्यमंत्र्यांचे विधान योग्यच आहे. प्रश्न: तुम्हीही कारखाना काढणार आहात.- हो काढणार. मला मते द्या नाहीतर तुमच्या उसाचे काही खरे नाही अशी दादागिरी कुणी शेतक-यांना करत असेल तर आम्ही त्याला विधायक मार्गाने पर्याय शोधणार. शेतक-यांचा स्वाभिमान खासगी कारखान्यांसमोर गहाण पडू नये यासाठी आम्ही सहकारी साखर कारखाना काढणार आहोत. तेथे शेतकरी मालक असेल. आमची जनता स्वाभिमानी आहे. ती लाचारी करणार नाही. खासगी कारखान्यातून काही कर्मचारी देखील कमी केले आहेत. हे काय लोकांचे कल्याण करणार व रोजगार देणार? प्रश्न: भाजप तालुकाध्यक्षांना मारहाण झाल्याचा आरोप झाला. नेमके काय घडले?- विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने असे प्रकार सुरु झाले आहेत. आमच्या कर्जत तालुकाध्यक्षांना मारहाण झाली. दादागिरी सुरु झाली आहे. खर्डा येथील सभेत अजित पवार म्हणाले, ‘यांना योग्य उत्तर देऊ’. आम्ही जर काही प्रश्नच निर्माण केले नाहीत तर हे काय उत्तर देणार आहेत. त्यांची भाषा कशी आहे ती बघा. प्रश्न: पालकमंत्र्यांनी विकास केला नाही असा राष्ट्रवादीचा आरोप आहे? - मतदारसंघ फिरले तर त्यांना विकास दिसेल. स्वत: अजित पवार एका भाषणात म्हणाले, ‘शिंदे यांनी विकास केला, पण अजून करायला हवा होता’. म्हणजे त्यांनीही विकास झाल्याचे मान्यच केले. मी सामान्य माणूस आहे. त्यांच्यामागे मोठे घराणे आहे. वलय आहे. त्यामुळे त्यांचा मोठा गाजावाजा होतो. मी मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न, कुकडीचा प्रश्न यासाठी जे काम केले त्यावर कधीही समोरासमोर चर्चेची तयारी आहे. कुकडी प्रकल्पाचा आराखडा ठरवून निधी मंजूर केला आहे. प्रश्न: मतदारसंघात काही जातीय समीकरणे दिसतात का?- मी जातपात, धर्म या पलीकडे जाऊन राजकारण करतो. लोक माझ्या कामाला ओळखतात. विरोधकांना हाताला काही लागत नाही म्हणून त्यांच्याकडून तसा प्रयत्न सुरु आहे. पण, कर्जत-जामखेडची जनता विकास पाहूनच मतदान करते यावर माझा विश्वास आहे.
जिल्ह्यात महायुतीचेच वर्चस्व राहणारनगर जिल्ह्यात भाजप-सेना युतीने चांगली बांधणी केलेली आहे. आमचे सर्व आमदार हे जनतेच्या सतत संपर्कात राहणारे आहेत.युतीचे सर्व नेते एकदिलाने काम करत आहेत. दोन्ही खासदार आमचे आहेत. त्यामुळे नगर जिल्हा पूर्णत: युतीला कौल देईल हा विश्वास आहे, असेही राम शिंदे म्हणाले.