अहमदनगर : गेल्या तीन वर्षांत केंद्र व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी विविध योजना आणल्या. या सर्वच योजना जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. या योजना राबविण्यासाठी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे अधिका-यांनी मनावर घेतल्यास विकास झाल्याशिवाय राहात नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.नगर शहरातील तांबटकर मळा येथील मैदानावर जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने आयोजित अहमदनगर जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार दिलीप गांधी होते.पालकमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान आणले आहे. देशाला व राज्याला जिल्हा मार्गदर्शक ठरत आहे. शेतक-यांसाठी विविध कृषी विषयक योजना, उपक्रमांची माहिती, अद्ययावत कृषी तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण प्रयोगशील शेतक-यांचे अनुभव, मार्गदर्शन या महोत्सवाच्या माध्यमातून शेतक-यांना उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून शेतक-यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करू न दिली आहे. जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियान अतिशय चांगल्या प्रकारे राबविले. त्यामुळे मार्च महिन्यातही शिवारात पाणी दिसत असून, टँकरची मागणी एकाही गावातून नाही. हे यश शेतक-यांचे आहे. ठिबक सिंचन योजनेसाठी केंद्र शासनाचे १० कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्यासाठी आणले आहे. दिवसेंदिवस सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करताना उत्पादन कमी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाऊसाहे ब-हाटे यांनी कृषी महोत्सव आयोजनामागील भूमिका मांडली.याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, सभापती अजय फटांगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ती जमदाडे-कोकाटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी, युवराज शेळके आदींची यावेळी उपस्थित होते.
आरोग्यपत्रिकेचे व्हावे योग्य मार्गदर्शन
शेतक-यांना कृषी विभागाकडून जमिनीची आरोग्यपत्रिका दिली जाते. मात्र आरोग्यपत्रिकेबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आवश्यक नसतानाही रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. यापुढील काळात आरोग्यपत्रिकेबाबत कृषी विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करावे, असेही राम शिंदे म्हणाले.