बाभळेश्वर : राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर हवामान बदलाच्या परिणामांची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या या राष्ट्रीय प्रकल्पातून चांगले निष्कर्ष समोर आले आहेत. या फलितांच्या आधारे राज्यस्तरावर पोक्रा नावाने प्रकल्प सुरू झाला आहे. भविष्यात हवामान बदलातून संकटे निर्माण होत राहतील. शेतक-यांसाठी हवामानाबद्दल प्रतिकारक असे तंत्रज्ञान विकसित होण्यावर भर दिला जाणार आहे, असे मत असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे पुणे विभागीय संचालक डॉ. लाखनसिंग यांनी केले.बाभळेश्वर (ता.राहाता) येथे आयोजित हवामान बदलावर आधारित राष्ट्रीय प्रकल्पातील कृषी विज्ञान केंद्राच्या विभागीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी कानपूर कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. आर. के. सिंग, केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था हैदराबाद येथील निक्रा प्रकल्पाचे समन्वयक डॉ. जेव्हीएनएस प्रसाद, केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे, बाभळेश्वरच्या निक्रा प्रकल्पाचे समन्वयक शैलेश देशमुख उपस्थित होते. भारतामध्ये सध्या शंभराच्यावर कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान बदलावर आधारित प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामध्ये नैसर्गिक साधन व्यवस्थापन, पीक पद्धती, बीज बँक, चारा बँक, फलोत्पादन असे घटक आहेत. हा प्रकल्प २०११ पासून सुरू आहे. आज प्रकल्पातून अनेक चांगले तंत्रज्ञान निष्कर्ष बाहेर आले आहेत. आता राज्याच्या संबंधित विभागाद्वारे यांचा व्यापक प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे, असेही डॉ. लाखनसिंग यांनी सांगितले.
शेतक-यांसाठी हवामानाबद्दल प्रतिकारक असे तंत्रज्ञान विकसित करणार-डॉ. लाखनसिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 5:43 PM