मुंबई - राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात भूकंप झाला असून त्यांनी जमा केलेल्या व्हिडिओ फाईलमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेही नाव आले आहे. त्यामुळे, यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत थेट केंद्र सरकारकडे बोट दाखवले. आता, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही यावर भाष्य केलं आहे. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्याशिवाय याबाबत बोलणे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे भाजप नेत्यांविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप काल केला. यासाठी त्यांनी तब्बल १२५ तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील सादर केलं. या व्हिडिओतील काही धक्कादायक संवाद त्यांनी विधानसभेत सादर केले. या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबाबत, आज शिर्डी येथील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत मांडलं. 'कोणत्याही इलेक्ट्रिक डिव्हाईसमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत याचा फॉरेन्सिक विभागाकडून योग्य तपास होत नाही, ते फुटेज नीट तपासले जात नाही. त्याचा योग्य तो अहवाल येत नाही तोपर्यंत कुणीही यावर प्रतिक्रिया देणे हे राजशिष्टाचाराला धरून नाही' असे आंबेडकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री केवळ नावालाच
'एसटी महामंडळाचा निरोप दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला. मात्र, उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री, कर्तृत्वाने नाहीत. एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग द्यावाच लागेल. हे चोर आणि लुटारुंचे सरकार. जे कामगार कामावर रुजू झाले त्यांच्याकडून वसुली सुरू असल्याची टीका आंबेडकरांनी केली. 'जेवढे दिवस कामावर गेला नाही त्याची नुकसान भरपाई घेतली जात आहे. पगार कपातीमुळे कामावर जावे का? असा प्रश्ना कामगारांपुढे आहे.
सरकारला एसटी महामंडळ मोडीत काढायचंय
सरकारला एसटी महामंडळ मोडीत काढायचे आहे. सत्ताधाऱ्यांना स्वतःच्या खासगी बसेस चालवायच्या आहेत. एसटी महामंडळ मोडण्यासाठी संप हे त्यांना साधन मिळाले आहे. यासाठीच सत्ताधारी आमदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री आणि सत्तेतील राजकीय पक्षांचे अध्यक्ष यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला.
काय म्हणाले शरद पवार
एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन १२५ तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. या व्हिडिओत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंही नाव आहे. याचं प्रकरणावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.