- सचिन धर्मापुरीकरकोपरगाव (जि. अहमदनगर) - भाऊसाहेब वाकचौरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, हा तुप चोर आहे. आता त्यांनाच उमेदवारी दिली. यात तुम्हाला कीती तुप मिळाले, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला. ज्यांच्यावर तुप चोर म्हणून टिका केली, त्यांचा प्रचारही ठाकरेंना करावा लागत असल्याचेही ते म्हणाले.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे महाविजय संकल्प सभा घेण्यात आली. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, निलम गोऱ्हे, दादा भूसे, आ. आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, विठ्ठलराव लंघे, बाळासाहेब मुरकूटे आदींची उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ५४२ खासदार आहेत. परंतू शिर्डीच्या खासदाराला देशभरात वेगळा मान आहे. ज्यावेळी तुम्ही खा. लोखंडे यांना मतदान कराल, त्याच वेळी शिर्डी मतदार संघाची बोगी मोदी यांच्या इंजिनला जोडली जाणार आहे. ही देशाची निवडणूक आहे. सर्वसामान्य लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा व विश्वात गौरव असलेले नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान करण्यासाठी लोखंडे यांना मतदान करण्याचे आवाहन करून केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
पश्चिमेचे पाणी या भागात आणूआ. आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पश्चिमेचे वाहून जाणारे पाणी पूर्वेला आणून नगर, नाशिक विरूद्ध मराठवाडा असा संघर्ष कमी करावा, अशी मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, निळवंडेच्या पोटचाऱ्याचे काम करणारच आहोत, या शिवाय पश्चिमेचे पाणी या भागात आणायचे आहे. या प्रकल्पास जल आयोगाची मान्यता घेतली आहे. लवकरच आराखडा तयार केला जाईल. या प्रकल्पाला ४० ते ५० हजार कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. परंतू 'मोदी है तो मुमकीन है' या प्रकल्पास निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.