अहमदनगर - महराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शिर्डीसाईबाबा मंदिरास जगभरातून भाविक भक्त भेट देतात. साई मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर अनेकजण आपली मनोकामना बोलून दाखवतात. तर, काहीजण मनोकामना पूर्ती झाल्याचे सांगत साईचरणी महागड्या वस्तूंचं अर्पण करतात. गुप्तदान पेटीतही अनेकदा कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू मंदिर समितीला प्राप्त झाल्या आहेत. आता, हैदराबाद येथील एका साईभक्ताने तब्बल 4 किलो सोनं साईचरणी अर्पण केलं आहे.
हैद्राबाद येथील पार्थ सारथी रेड्डी यांना 2016 मध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याची पट्टी दान करायची होती. परंतु, त्यावेळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने सोनं अर्पण करायचं राहून गेलं होतं. त्यानंतर, कोविड महामारीमुळे ही दानप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे, साईभक्त पार्थ रेड्डी यांनी मंदिर समितीच्या सूचनेनुसार आत्ता हे 4 सोन्याची पट्टी दान केली आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी दिली. साईबाबांच्या मूर्तीच्या चौथऱ्याभोवती ही पट्टी बसविण्यात आली आहे. सध्याच्या बाजार भावानुसार या सोन्याच्या पट्टीची किंमत 2 कोटी रुपये एवढी आहे.