तिसगाव : डफ, ढोल ताशांचा निनाद, रेवड्यांची मुुक्त उधळण तर आनंदाने बेभान नाचत मुखी नाथांचा जयघोष करीत पहाटेची महाआरती ते दुपारचे चार वाजेपर्यंत राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो मानाच्या काठ्या श्रीक्षेत्र मढी (ता.पाथर्डी) येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिराच्या शिखराला भेटविण्यात आल्या. त्यासोबतच लाखो भाविकांनीही संजीवन समाधी दर्शनाची पर्वणी साधली.‘छैल छबिना छडीचा कान्होबा, देव मढीचा आदेश अलख निरंजन, कानिफनाथ महाराज की जय, ‘हरहर महादेव’ अशा गगनभेदी घोषणा, शंखध्वनीच्या आवेषानी नाथभक्तांच्या उत्साहाला मध्यान्हीच्या कडक उन्हातही चांगलेच भरते आले. वाहनांच्या प्रचंड गर्दीने पाथर्डी रस्ता ते मराठी शाळा, गणेश चौक या मढी गावातील अंतर्गत रस्त्यावर अनेकदा तासनतास वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे पादचा-यांना गल्ली, बोळाचा पुढे जाण्यासाठी आधार घ्यावा लागला. यात्रा काळात हजारो रुपयांचा कर रूपाने महसूल गोळा करणा-या स्थानिक ग्रामपंचायतीने कच्च्या रस्त्यांवर पाणी मारण्याचीही तसदी न घेतल्याने गाव परिसरात धुळीचेच साम्राज्य राहिले.
सोमवारी रात्री दत्तमंदिरामागे गाढवांच्या बाजारात दोन गाढवे मृत झाल्याची घटना यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. अनेक दिवसाचा पायी प्रवास तर येथे पाणी वेळेवर न मिळाल्याने ही घटना घडल्याचा आरोप प्रसंगी सुरु होता. दुसºया बाजूला नाथांचा प्रसाद म्हणून मान असलेल्या रेवडीच्या भावाने शंभरी गाठली. चिमटा, डमरू, शैलीशिंगी (गळ्यात घालण्याचा कंठा) त्रिशूळ चाट, मोरपिसे, ताईत मोरपिसे, नाडा या नाथपंथीय पूजापाठ साहित्याच्या जोडीने शेतीकामाची वैविध्यपूर्ण साहित्य अवजारेही यात्रेत विक्रीसाठी सज्ज होती.सोमवारी रात्री विजेचा लपंडाव सुरु राहिल्याने पर्यायी व्यवस्था नसणा-या व्यावसायिकांना कंदील, बत्ती, चिमण्या, मेणबत्ती यांचा आधार घ्यावा लागला. कानिफनाथ गड परिसर व यात्रा परिसरात खिसेकापंूच्या उपद्रवाचा सार्वत्रिक त्रास राहिला.तुलनेत कारवाईचे प्रमाण नगण्य होते. तर भूमिगतरित्या अवैध दारूविक्री सुरु असल्याचे वास्तव नागरिकांनी ऐकविले. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असे बोलले गेले.सायंकाळी पाचनंतर रंगपंचमीचा उत्साह ओसरला. गावोगावीचे येथे आलेले अस्थान्या व दिंड्यांनी श्रीक्षेत्र पैठणकडे नाथषष्टीसाठी परतीचा मार्ग धरला. दरम्यान १३ ते १६ मार्च दरम्यानच्या यात्रा कालावधीत कानिफनाथांचे संजीवन समाधीचे मुक्तद्वार दर्शन सोहळा आधीच विश्वस्त मंडळाने घोषित केल्याने नियमित दर्शनाची संख्या रोडावली होती. देवस्थानचे अध्यक्ष आण्णासाहेब मरकड, शिवशंकर राजळे, सचिव सुधीर मरकड, कोषाध्यक्ष दत्तात्रय मरकड, विश्वस्त ज्योती मरकड, मधुकर साळवे, शिवाजी मरकड, कार्यकारी अधिकारी अशोक पवार आदींनी भाविकांचे स्वागत केले. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्री तमाशे,भजन, कीर्तन जागर उशिरापर्यंत सुरु होता. तिसगाव शहरातही वाहन कोंडीचे प्रकार घडले.