अध्यात्मिक -भज गोविंदम्-२/मूढ जहीहि धनागमत्रुष्णाम। कुरू सद्बुध्दि मनसि वित्रुष्णाम ॥यल्लभसे निजकमोर्पात्तं । वित्तं तेन विनोदय चित्तम ॥२॥भज गोविंदम् भज गोविंदम् भज गोविंदम् मूढमते॥ध्रु॥आचार्य या श्लोकाच्या आरंभालाच ‘मूढ’ शब्दाने सुरवात करतात. मूर्ख लोक हे अज्ञानी असतात. सकाम असतात. त्यांना धनाची संपत्तीची हाव असते. सारासार विचार त्यांच्या ठिकाणी नसतो. अशा लोकांना आचार्य म्हणतात ‘हे मूर्खा ! (अज्ञानी) ही धनतृष्णा तू सोडून दे ! मनात सदबुद्धी सतत राहावी व या वितृष्णेपासून दूर राहा आणि जे तुझ्या कर्माने तुला मिळेल, त्यात तू समाधानी रहा. भावगंध-मूढ शब्दाचा पातंजल योगशास्रामधे अर्थ दिलेला आहे. त्यात चित्ताचे-क्षी चित्त, विक्षिप्त चित्त, निरुध्द चित्त, एकाग्र चित्त, चंचल चित्तमूढ चित्त असे प्रकार सांगितले आहेत. मूढ चित्त म्हणजे तमोगुणाने व्यप्त असलेले चित्त. अशा चित्ताच्या माणसाला झोप जास्त असते. किर्तनी बसता निद्रे नागविले । मन हे गुंतले विषयसुखा ॥ ना.म.॥ मूढ चित्ताच्या व्यक्तिला श्रवणात गोडी उत्पन्न होत नाही. पण प्रापंचिक गप्पा, पैशाच्या चर्चा निघाल्या की मग मात्र हा सावध होतो. धनाचा लोभ त्याला स्वस्थ बसू देत नाही. श्रीमद्भागवतच्या ११ व्या स्कंधामधे कदर्यु आख्यान आहे. हा कदर्यु इतका कंजूष असतो की त्याच्या घरात धान्याचे कोठारे भरलेली असूनही मुंगीला उपवास, उंदराला लंघन घडत होते. घरच्या लोकांना ताजे अन्नही मिळू देत नव्हता. एवढा धनलोभी होता. काळाच्या ओघात त्याचे होत्याचे नव्हते झाले व नंतर त्याला विरक्ती झाली. त्याने धनाचे नश्वरत्व सांगितले. तो म्हणतो धनाच्या मागे १५ अनर्थ आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आदी अनेक विकार फक्त धनामुळे येतात. ज्याच्याजवळ धन असते, असा मनुष्य अतिशय अहंकारी असतो. त्याला वाटते तो धनाच्या बळावर काहीही प्राप्त करू शकतो. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात...धनमान बळे नाठविसी देवा । मृत्युकाळी तेव्हा कोण आहे ॥ किंवा तुका म्हणे धन। धनासाठी देती प्राण ॥ धन मिळविण्यासाठी नरबळी दिल्याच्या घटना आपण वृत्तपत्रामध्ये वाचतो. आता भरपूर पैसे मिळाले असे कधीच कोणाला वाटत नाही. धन दारा पुत्र जन । बंधू सोयरे पिशुन । सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी॥ ना.म.। हे सर्व मिथ्या जाणून या शब्दाला महत्व आहे. धन टाकायचे नाही तर ते मिथ्या, नष्ट होणारे आहे. असे जाणून त्याचा विनीयोग करायचा. वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥ असे संत तुकाराम महाराज सांगतात. अशा पद्धतीने धनाचा वापर केला तर ते धन तारक ठरते. नाही तर ते धन मारकच ठरते.‘म्हणे आजि मिया । संपत्ती बहुतेकाचिया । आपुल्या हाती केलीया। धन्य ना मी ॥ धनतृष्णा मोठी आहे. असा माणूस कंजूष असतो. विधायक कामासाठीकधी वर्गणीही देणार नाही. उलट उष्ट्या हाते नुडवी काग ॥ उष्ट्या हाताने तो कावळा सुध्दा उडवीत नाही. कारण हातातील शिते जर कावळ्याला मिळाले तर?! येथे येउनि केलेसी कायी । विठ्ठल नाही आठविला अहा रे मुढा भाग्यहिना। गेलासी पतना मोह भ्रमे ॥२॥ तात्पर्य अशा व्यक्तीला मूढ म्हणतात. म्हणून आचार्य फार सुंदर उपाय सांगतात. ते म्हणतात अरे! जीवा तू मनात सद्बुद्धी, विरक्ति, निराभिलाषी होण्याचा प्रयत्न कर. व्यवहार सोडायला ते सांगत नाहीत. फक्त अलिप्तपणे व्यवहार करायला सांगतात. पद्मपत्रमिवांभसा कमळाचे पान पाण्यात असते, परंतु ते त्या पाण्यात लिप्त होत नाही. मग मी व्यवहारी असेन वर्तत । जेवी जळाआत पद्मपत्र ॥ तु.म.॥ याप्रमाणे जीवनात राहिले तर समाधान प्राप्त होते. प्रत्येकाला कर्मानुसार फल मिळत असते. मना त्वाचि रे पूर्व संचित केले । तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥ श्री रामदास स्वामी ॥ कर्मानुसार संचित होते. संचितच पुढे प्रारब्ध म्हणून भोगायला प्राप्त होते. प्रारब्धेचि जोडे धन । प्रारब्धेचि वाढे मान ॥ १॥ प्रारब्धेचि भरे पोट । तुका करिना बोभाट ॥ ज्याप्रमाणे आपण कर्म करु त्याप्रमाणे जर घडत असेल तर आता दोष कोणाला द्यावा? म्हणून तुका म्हणे आता देवा का रुसावे । मनासि पुसावे काय केले ?॥कलियुगात सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. शुध्द चित्त करुन जर नामभक्ती केली तर सहज अत्यंतिक समाधान प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होतो. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान हे संत तुकाराम महाराज यांचे म्हणणे किती सार्थ वाटते. संतांनी जगाला आळसी न बनवता मानसिक समाधान कसे प्राप्त करावे? हे सांगितले. सुखी संसाराची गुरूकिल्ली आपल्या हातात दिली आहे.
-भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले, गुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी (पाटील), अहमदनगर.