श्रीगोंदा : बीड जिल्हा बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून गोरगरिब माणसांच्या जमिनी कवडीमोल भावाने लुटणारे नेते धनजंय मुंडे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसे पवित्र करून घेतले? असा सवाल उपस्थित करत मुंडे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची माफी मागावी. माफी न मागितल्यास धनंजय मुंडेंना श्रीगोंद्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा श्रीगोंद्यातील भाजपा-सेना नेत्यांना दिला आहे.जिंतूर येथे शिवस्वराज्य यात्रेत धनंजय मुंडे यांनी बबनराव पाचपुते यांचा उल्लेख ‘बबन्या’ असा केला. या बोच-या टीकेचे श्रीगोंद्यात पडसाद उमटले. आजा शुक्रवारी भाजपा-सेना कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले यांना निवेदन देत मुंडे यांच्या विधानाचा निषेध केला.धनंजय मुंडे यांना आदरणीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे राजकीय दिशा मिळाली. मात्र त्यांच्यांशी विश्वासघात केला. पंकजा मुंडे यांना त्रास देण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला. बेछूट अन बालिश विधाने करून हा पक्ष रसातळाला घातला. विरोधी पक्ष नेते म्हणून अपयश आले म्हणून धनंजय मुंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आमचे राजकिय दैवत बबनराव पाचपुते सहा वेळा आमदार झाले. तीन वेळा मंत्रीपद तर तीन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद भुषविले आहे. त्यामुळे पाचपुतेंवर धनंजय मुंडे यांनी केलेली टिका म्हणजे ‘बुडतीचे पाय डोहाकडे’ असा प्रकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर सभापती शहाजी हिरवे, भाऊसाहेब गोरे, संदीप नागवडे, संतोष खेतमाळीस, बापुसाहेब गोरे, प्रतिभा झिटे, दत्तात्रय कोठारे, आबा दांगडे, विनोद होले, बंडू काकडे, रोहीत गायकवाड, बशीर काझी यांच्या सह्या आहेत.
धनजंय मुंडेंनी पाचपुतेंची माफी मागावी, अन्यथा श्रीगोंद्यात पाय ठेऊ देणार नाही : भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 2:47 PM