जामखेड - मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नगरहून बीड - परळीकडे जात असताना मंत्री धनंजय मुंडे यांचे जामखेड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. याचदरम्यान राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजकीय भूमिकेचा निषेध केला. फलक घेतलेल्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. मुंडे यांनीही यावेळी राजकीय बोलणे टाळत कार्यकर्त्यांशी हितगुज साधले.
कॅबिनेट मंत्री बीड येथे जाण्यासाठी गुरुवारी जामखेडला येणार असल्याची माहिती समजताच तालुक्यातील मुंडे समर्थक बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब गर्जे, मोहा ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी डोंगरे, भाजप विधी सेवा जिल्हाध्यक्ष प्रवीण सानप, बाजीराव गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे आदींनी खर्डा चौक परिसरात फलक लावले. दुपारी एकच्या दरम्यान मुंडे यांचे आगमन होताच क्रेनला भला मोठा हार अडकवून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच काही कार्यकर्त्यांनी हार - पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. मंत्री मुंडे यांनीही कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. मात्र, या कार्यक्रमात मुंडे यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.
त्याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले व अन्सार पठाण यांनी शरद पवारांच्या समर्थनाचे फलक हातात घेत मंत्री मुंडे यांच्या भूमिकेचा निषेध केला. पोलिस निरीक्षक महेश पाटील हे या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना झटापट झाली. या तिन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.