धनंजय, कधी कधी हरभजन सिंगही सामना जिंकून देतो रे - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:40 AM2018-02-16T10:40:32+5:302018-02-16T10:45:17+5:30

राहुरीच्या सभा मैदानावर अजित पवार , धनंजय मुंडेंची बॅटिंग रंगली

Dhananjay, sometimes Harbhajan Singh will win the match - Ajit Pawar | धनंजय, कधी कधी हरभजन सिंगही सामना जिंकून देतो रे - अजित पवार

धनंजय, कधी कधी हरभजन सिंगही सामना जिंकून देतो रे - अजित पवार

राहुरी : आज माझी खूप अवघडल्यासारखी परिस्थिती झाली आहे. क्रिकेटच्या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीनंतर हरभजन सिंग बॅटिंगला आला आहे. आता त्याची बॅटिंग कोण पाहणार तसे माझे झाले आहे, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हणताच ‘अरे धनंजय कधी कधी हरभजनसिंगही सामना जिंकून देतो रे. त्यामुळे तू बिनधास्त बॅटिंग कर’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांना धीर दिला.
झाले असे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेस गुरुवारी श्रीगोंदा येथून प्रारंभ झाला. त्यानंतर शेवगाव येथील सभा झाल्यानंतर राहुरी येथील शेवटच्या सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते पोहोचले होते. सायंकाळी असलेल्या सभेला विलंब होऊ लागल्याने विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे थेट व्यासपीठावरच आले आणि भाषणाला सुरुवात केली. तर युवकांच्या आग्रहाखातर धनंजय मुंडे मोटारसायकल रॅलीसाठी स्वत: मोटार सायकलवर बसून रॅलीत सहभागी झाले. मोटारसायकल रॅली संपवून मुंडे सभास्थळी आली तेव्हा अजित पवार यांचे भाषण सुरु होते. अजित पवार यांचे भाषण संपताच उपस्थितांनी धनंजय मुंडे यांनी भाषण करावे, असा आग्रह धरला.
प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षनेते यांनी भाषण केल्यानंतर मी बोलणे पक्षशिस्तीत बसत नाही, असा निर्वाळा मुंडे यांनी दिला. मात्र तरीही श्रोत्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी मुंडे यांना भाषण करण्याची परवानगी दिली. कोहलीची बॅटिंग झाल्यानंतर हरभजन सिंगची बॅटिंग आता कोण पाहणार? असा मिश्किल सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. यावर त्याच खेळकर वृत्तीने अजित पवारांनीही मुंडे यांना उत्तर देत म्हटले की, कधी कधी हरभजन सिंग सुद्धा सामना जिंकून देतो, तू बिनधास्त भाषण कर, अशा शब्दात धनंजय मुंडे यांना मॅच वीनरचा किताब दिला.
मुंडे जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे आभार व्यक्त केले. पक्षशिस्त पाळणारा मी एक आज्ञाधारक कार्यकर्ता आहे़ त्यामुळे मला आज शेवटी बोलताना खूप अवघडल्यासारखे वाटते. दादा तुम्ही परवानगी दिली, हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही आदेश दिला आहे आणि मी आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे, म्हणून बोलतो असे सांगत आपल्या नेहमीच्या फॉर्मात सरकारविरुद्ध जोरदार बॅटिंग करीत सभा जिंकली.

Web Title: Dhananjay, sometimes Harbhajan Singh will win the match - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.