अशोक निमोणकर
चोंडी (अहमदनगर) : धनगर आरक्षण देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही ५० दिवसात पूर्ण करण्यात येईल, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्यानंतर गत २० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मंगळवारी, आज २१ व्या दिवशी सुटले.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी जामखेड तालुक्यातील चोंडी येथे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रुपनवर, गोविंद नरवटे, समाधान पाटील, नितीन धायगुडे, किरण घालमे, बाळा गायके हे ६ सप्टेंबरपासून उपोषणाला बसले होते.
मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दुपारी चौंडीत येत उपोषणकत्यांशी चर्चा केली. २१ सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत चर्चेअंती एकमताने निर्णय घेतले आहेत. या बैठकीला यशवंत सेनेचे शिष्टमंडळ उपस्थित होते. आरक्षणासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यात आला. आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला. आरक्षणासाठी अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीमध्ये धनगर समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. आरक्षणाबाबतची ही कार्यवाही ५० दिवसात पूर्ण करण्याबाबत निर्णय झाला. त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती महाजन यांनी केली. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.