जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे गावचे ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज मंदिरात महापूजा करून साध्या पद्धतीने धर्मनाथ बीज उत्सवास प्रारंभ झाला.
दरवर्षीप्रमाणे जवळे येथील सोमवंशी जहागीरदार वाड्यातील धर्मनाथांची मूर्ती ताशा-सनईच्या सुरात मंदिरात आणण्यात आली. येथे मंदिरातील मूर्तीसह मानाच्या मूर्तीचा संभाजीराव शिवाजीराव सोमवंशी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. महापूजेनंतर भाविकांनी धर्मनाथाचे दर्शन घेण्यासाठी प्रारंभ केला.
दरवर्षीप्रमाणे भाविकांनी आंबिल घुगऱ्याचा प्रसाद धर्मनाथ चरणी अर्पण केला. धर्मनाथाच्या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमले . यंदा कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामस्थांनी धर्मनाथ बीज साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.
धर्मनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने धर्मनाथांची मुख्य मूर्ती विठ्ठल मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती धर्मनाथ जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संतोष शंकर पठारे यांनी दिली.
फोटो १३ जवळे
जवळे येथील धर्मनाथ महाराज मंदिरातील मूर्ती.