दाढ खुर्द शिवारातील वाघमारे वस्तीवरील नानाभाऊ वाघमारे यांच्या बंदिस्त जनावरांच्या गोठ्यावर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सहा बिबटे दिसले. शेळ्यांनी मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. काय झाले हे पाहण्यासाठी वाघमारे कुटुंबीय घराबाहेर आले. यावेळी त्यांना गेटसमोर दोन बिबटे दिसले. घराच्या मागील बाजूला दोन, तर आंब्याच्या झाडाचा आधार घेऊन बंदिस्त गोठ्यात शिरलेले दोन बिबटे दिसले. यावेळी बिबट्यांनी दोन शेळ्यांना ठार करीत एक शेळी गोठ्याबाहेर नेली. यावेळी बिबट्यांना पिटाळून लावण्यासाठी वाघमारे कुटुंबीय सरसावले असता बिबट्याने बबई वाघमारे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या. कोणतीही मोठी दुर्दैवी घटना घडण्याआधी हल्ला करणाऱ्या सहा बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी दाढ खुर्द येथील ग्रामस्थांनी केली आहे.
...........
वनमंत्र्यांना फोन
घाबरलेल्या नानाभाऊ वाघमारे यांनी स्थानिक नागरिकांसह संगमनेर वनविभागाला माहिती देण्यासाठी फोन केला असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे वाघमारे यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांना फोन करून घडलेल्या गंभीर घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनमंत्र्यांनी थेट प्रशासकीय यंत्रणेल्या हलवल्याने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यासह अधिकाऱ्यांचा फौजफाटा रात्री अडीच वाजेच्या सुमारास वाघमारे यांच्या वस्तीवर दाखल झाला. घटनास्थळी अधिकारी तळ ठोकून आहेत.