चार वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपानं 'मोठा भाऊ' होण्याचा मान मिळवला खरा, पण 'छोट्या भावा'ला - अर्थात शिवसेनेला सोबत घेऊनच त्यांना सरकार स्थापन करावं लागलं होतं. आता अहमदनगर महानगरपालिकेतही भाजपा 'मोठा भाऊ' ठरला आहे, पण महापौरपदाची खुर्ची त्यांना मिळू द्यायची का, हे 'छोटा भाऊ'च ठरवणार आहे. धुळे महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. ७४ पैकी ५० जागांवर त्यांनी मुसंडी मारलीय. परंतु, अहमदनगर महानगरपालिका निवडणूक निकालात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाहीए. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने २५ जागांपर्यंत मजल मारलीय, तर भाजपाला १८ आणि शिवसेनेला १७ जागांवर यश मिळताना दिसतंय. अपक्ष आणि इतर सात जागांवर पुढे आहेत.
अहमदनगरमध्ये बहुमतासाठी ३५ जागा आवश्यक आहेत. अपक्ष आणि इतर पक्षाच्या उमेदवारांची मदत मिळाली, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तिथवर पोहोचू शकत नाही. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाला सत्ता स्थापन करायची असेल, तर शिवसेनेच्या १७ नगरसेवकांना सोबत घेतल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे आता स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आपल्या 'जुन्या मित्रा'ला साथ देते का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. सत्ता हवी असेल तर भाजपाला पाठिंबा देण्याशिवाय सेनेकडेही पर्याय नाही.
भाजपा-राष्ट्रवादी एकत्र?
दुसरीकडे, नरेंद्र-देवेंद्र यांच्या नावाने रोज शंख करणाऱ्या शिवसेनेची साथ भाजपा घेणार का?, याबद्दलही उत्सुकता आहे. काही जणांच्या मते, नगरमध्ये भाजपाचं राष्ट्रवादीशी 'कौटुंबिक सख्य' आहे. भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची कन्या ही राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पत्नी आहे. ती निवडणूक रिंगणात उतरली होती आणि विजयीही झाली आहे. त्यामुळे भाजपा नगरसेवक राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन, शिवसेनेला हिसका आणि काँग्रेसला झटका देऊ शकतात, असंही समीकरण मांडलं जातंय. परंतु, लोकसभेच्या निवडणुकांचा विचार करता, ही जोखीम भाजपा पत्करणार का, याबद्दलही शंका आहे. कारण, भाजपा-शिवसेना युती होणारच, असं भाजपाध्यक्ष अमित शहांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळेच नेते ठामपणे सांगताहेत. म्हणजेच, नगरमध्ये शिवसेनेला बाजूला ढकलणं त्यांना परवडणारं नाही. त्यामुळे, 'आपण दोघे भाऊ-भाऊ' हे गाणं नगरमध्ये ऐकू येण्याचीच शक्यता जास्त आहे.
LIVE UPDATES साठी खालील लिंकवर क्लिक करा....