देशमुख म्हणाले, ३१ मार्च २०२१ला अगस्ती साखर कारखान्याची वार्षिक सभा होती. सभा संपल्यानंतर एक चॅनल व वेबसाईटला संचालक मच्छिंद्र धुमाळ यांनी माझी बदनामी केली. त्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. आपण शिवराळ भाषेत उत्तर देणार नाही. न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे. माझा प्रशासकीय सेवेचा काळ स्वच्छ, पारदर्शी राहिल्याने पुणे बाजार समितीत सेवानिवृत्तीनंतरही एक वर्ष मुदतवाढ मिळाली. आपल्या कारभाराची चौकशी होऊन क्लिनचिट मिळाली, त्याचे कागद आपल्याकडे आहेत.
माझ्यावर आरोप करणारांनी न्यायालयात येऊन ते सिद्ध करावेत.
अगस्ती साखर कारखान्याची आर्थिकस्थिती, चुकीच्या पद्धतीने सुरू असलेला कारभार जनतेपुढे आणला म्हणून मुद्द्यांना बगल देत चुकीचे आरोप केले जात आहेत. त्यांना बोलविणारे धनी वेगळे आहेत. ज्यांनी गरिबांच्या जमीन लाटल्या, नको त्या चुका केल्या, घोटाळे केले, त्यांना पक्ष बदलावे लागत आहेत.
माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या निधनामुळे चौदा दिवस गप्प होतो. माझे दोन्ही भाऊ कारखान्याचे संचालक होते. त्यांनी आमच्या वडिलोपार्जीत मालमत्तेवर कर्जाचा बोजा चढवून कारखान्याला मदत केली आहे.
चांगल्या माणसांना बदनाम करणारी टोळी तालुक्यात सक्रिय असून, आता जशास तसे उत्तर देऊ, असा सुचक इशारा देशमुख यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत उपस्थित होते.