अकोले : अकोले तालुक्यातील विकासासाठी सहकार्य केले. भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करून तालुक्याला हक्काचे पाणी दिले. पाण्याच्या योजना केल्या. आदिवासीच्या उन्नतीसाठी योजना केल्या आणि ते राष्ट्रवादीला सोडून गेले. लोकशाही आहे. त्यांना जाऊ द्या. पण सांगतात काय तर विकास करण्यासाठी गेलो. मग त्यांनी ४० वर्षे गवत काढले काय ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांना केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ अकोले येथील बाजारतळावर रविवारी झालेल्या प्रचारसभेत पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आदिवासींसाठी आम्ही केलेल्या कायद्याचे उल्लंघन करून त्यांनी भलत्याच तालुक्यात विकास केला. त्याचे शुक्लकाष्ट मागे लागू नये म्हणून ते तिकडे गेले. त्यांना धडा शिकविण्याची संधी सोडू नका. डॉ. लहामटे यांना साथ द्या, असे आवाहन पवार यांनी केले.आदिवासींच्या उन्नतीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली. महिलांना ५० टक्के आरक्षण दिले गेले. रोजगार हमी कायदा, मंडल आयोग अंमलबजावणी, शेतक-यांना कर्ज माफी ही कामे मी मुख्यमंत्री असताना केली. राज्यातील औद्योगिक वसाहतींना चालना देत बेरोजगारी कमी करण्यासाठी काम करताना राज्य देशात एक नंबर वर नेऊन ठेवले. गेल्या पाच वर्षात राज्याची अधोगती झाली आणि बेकारी वाढली, असा आरोप करीत राज्यात सत्ता बदल करण्यासाठी तरुणाई सरसावली आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. याप्रसंगी दशरथ सावंत, डॉ अजित नवले, विनय सावंत, अशोक भांगरे, अमित भांगरे, डॉ. लहामटे यांची भाषणे झाली.
पिचडांनी ४० वर्षे गवत काढले काय? शरद पवारांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 2:07 PM