लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठलेला असताना नगर तालुक्यात मात्र खुलेआम रस्त्यावरच डिझेलची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. हे वापरण्यास बंदी असलेले केमिकलयुक्त डिझेल किंवा बायोडिझेल असल्याची चर्चा आहे. अवघ्या ७८ रुपये प्रतिलिटर दराने हे डिझेल ट्रकचालकांना विकले जात आहे. या तस्करीमुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून, जिल्ह्यात डिझेल तस्करीचे रॅकेट सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
नगर तालुक्यातील नगर-सोलापूर रस्त्यावर तस्कर चक्क टँकरमधून थेट वाहनांमध्ये डिझेल भरतात. विशेष म्हणजे वाहन चालकांना एक पावतीही दिली जाते. त्यावर ७८ रुपये लिटर असा दर दिसतो. नगर तालुक्यात ही खुलेआम विक्री सुरू आहे. नगर तालुक्यातील रूईछत्तिसी परिसरात डिझेलचा टँकर रस्त्याच्या कडेला उभा केला जातो. या टँकरमधून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमध्ये हे डिझेल भरले जाते. साधारणपणे हा प्रकार नित्यनेमाने सुरू असून, २४ तास विक्री सुरू आहे. स्वस्तात मिळत असल्याने वाहनचालकही येथे रांगा लावून डिझेल भरतात. गुजरात व मुंबई येथून या डिझेलची तस्करी होत असल्याची चर्चा आहे.
..............
तब्बल १८ रुपयांनी डिझेल स्वस्त
सध्या डिझेलचा भाव ९६ रुपयांवर पोहोचला आहे. या पंपावरील डिझेलपेक्षा तस्करी केलेले डिझेल कमी दराने विकले जात आहे. तस्करीच्या डिझेलची विक्री ७८ रुपये प्रतिलिटरने केली जात आहे. त्यामुळे एका लिटरमागे जवळपास १८ रुपयांपर्यंत फायदा वाहनचालकांना होतो. त्यामुळे नगर-सोलापूर रस्त्याने जाणाऱ्या अवजड वाहनांचे चालक या डिझेलला पसंती देतात. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदारी असते. आणखी काही ठिकाणी या डिझेलची विक्री होत असल्याची चर्चा आहे. या विक्रीचे व्हिडीओ ‘लोकमत’कडे आहेत.
.................
अशी विक्री कशी काय केली जाऊ शकते, अशा विक्रीला परवानगी नसते. हा प्रकार नेमका काय आहे, ते पाहावे लागेल. दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- उमेश पाटील, तहसीलदार, नगर तालुका
....................
बांधावर डिझेल विक्रीची परवानगी सरकार, संबंधित कंपनी देते. मात्र, रस्त्याच्या कडेला असा प्रकार होत असेल तर गंभीर आहे. बांधावरील विक्रीच्या परवानगीचा गैरफायदा संबंधित घेत असतील तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करू.
-जयश्री माळी, पुरवठा अधिकारी, अहमदनगर
.................
हा प्रकार गंभीर आहे. अशाप्रकारच्या विक्रीसाठी परवानगी नसते. त्यामुळे हे भेसळयुक्त डिझेल असण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यावर कारवाई करून सत्य उजेडात आणावे.
- चारुदत्त पवार, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशन