अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत उमेदवाराकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर विविध पथकांचा वॉच असणार आहे़ निवडणूक काळात निघणाऱ्या संघर्ष यात्रा, मेळावे, सभा आदींवर होणाऱ्या खर्चाचा हिशोब घेण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ नियुक्त करण्यात आलेल्या विविध पथकांच्या प्रमुखाशी चर्चा करून हिशोब सादर करण्याच्या सूचना उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील माळी यांनी बैठकीत केल्या़उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे उमेदवाराच्या खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी नियुक्त पथकाच्या प्रमुखांची बैठक झाली़ या बैठकीत माळी बोलत होते़ निवडणुकीची अधिसूचना येत्या शनिवारी जारी होणार असून, उमेदवारासाठी २८ लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा आहे़ निवडणूक काळात राजकीय पक्ष व उमेदवारांकडून मोठ्याप्रमाणात खर्च केला जातो़ उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मतदारसंघनिहाय विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यामध्ये प्रचार यंत्रणेचे छायाचित्रीकरण पथक, खर्चाचे विश्लेषक, भरारी पथक, तपासणी नाका पथक, खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण समितीचा समावेश आहे़ सर्व समित्यांनी आपल्याकडील माहिती वरिष्ठांना कळवायची असून, वरिष्ठ समितीने त्याचे विश्लेषण करून अहवाल तात्काळ सादर करायचा असल्याचे माळी म्हणाले़ उमेदवारांना निवडणुकीसाठी २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे़ उमेदवाराच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचाराचे छायाचित्रण केले जाणार आहे़ सभेसाठी वापरली जाणारी वाहने, झेंडे, फलक, टोप्या, प्रचार साहित्य आदींचे चित्रण करून हिशोब काढला जाणार असून, त्याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले़ (प्रतिनिधी)
उमेदवाराच्या खर्चावर विविध पथकांचा वॉच
By admin | Published: September 17, 2014 11:28 PM