अहमदनगर: नगर शहरातील हॉटेल व्यवसायिकाकडून तीन लाखांची खंडणी मागत एक लाख रुपये स्वीकारत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंदूराष्ट्र सेनेचा पदाधिकारी दिगंबर गेंट्याल याला सोमवारी सायंकाळी शहरातील माळीवाडा परिसरातून अटक केली.
या प्रकरणातील तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे दारु विक्रीसाठी लागणारा परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदर अर्जावरुन त्यांना दारु विक्रीचा परवाना मिळाला होता. दिगंबर लक्ष्मण गेंटयाल याने सदर परवाण्याबाबत माहीतीच्या अधिकारात अर्ज करून उत्पादन शुल्क विभागाकडे कोणत्या कागदपत्राचे आधारे परवाना दिला याबाबतची माहीती मागवुन घेतली होती.
सदर माहीतीचे आधारे गेंट्याल हा तक्रारदार यांना सदर हॉटेल परवाना हा नियमानुसार मिळाला नसुन त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या वरीष्टांकडे तक्रारी करुन तुझा हॉटेल परवाना रदद करतो . अशी धमकी देत तीन लाख रुपयांची मागणी करत होता. याबाबत सदर हॉटेल व्यावसायिकाने जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे तक्रार दिली होती.
पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे हा अर्ज वर्ग करून कारवाई करण्यास सांगितले होते त्यानुसार उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिशिरकुमार देशमुख , सोळके, मेढे, कॉन्स्टेबल रविंद्र पांडे , दत्तात्रय गव्हाणे, रविद्र कर्डीले , पोकॉ संदिप दरंदले , कमलेश पाथरुट , रोहीत मिसाळ सापळा रचला. तक्रारदार याना सोमवारी सायंकाळी एक लाख रुपये रक्कम सोबत घेण्यास सांगून ठरलेल्या ठिकाणी गेंट्याल याला पैसे घेण्यासाठी बोलावून घेण्यास सांगितले. काही वेळातच पैसे घेण्यासाठी गेंट्याल माळीवाडा परिसरात आला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी गेंत्याल यच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. े