अहमदनगर - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते दिलीप गांधी यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली, ते 69 वर्षांचे होते. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली होती, त्यानंतर दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवार रोजी कर्मभूमी असलेल्या नगर जिल्ह्यातच अंत्यसंस्कार होणार आहेत.
दिलीप गांधी यांचा पार्थिव देह उद्यापर्यंत नगरमध्ये आणण्यात येईल. उद्या गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता शहरातील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीर त्यांच्या अंत्यसंस्काराला गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. दिलीप गांधी यांच्या निधनामुळे नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली असून भाजपा कार्यकर्त्यांसह अनेकांनी त्यांच्या आठवणी जागवल्या.
नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार बनून गांधी यांनी तीनवेळा प्रतिनिधित्व केलं. 1999 में पहील्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. या कार्रयकाळात 2000 ते 2004 ग्रामीण विकास समिती आणि 2000 ते 2003 पर्यंत वित्त मंत्रालयाच्या सल्लागार समितिचे सदस्य होते. 2009 मध्ये दुसऱ्यांदा ते लोकसभेत निवडून गेले.तर २०१४ मध्ये तिस-यांदा लोकसभेवर निवडून आले.
गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीतच होते, आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दिलीप गांधी यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजपच्या कामाला सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहराध्यक्षाची पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. 1985 ते 1999 पर्यंत अहमदनगर नगरपालिकाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.