अहमदनगर: मोदी यांच्या नव्या सरकारमध्ये नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्या समावेशाची शक्यता धूसर झाली आहे. महाराष्ट्रात चारवेळा खासदार झालेल्यांची नावे भाजपाने तयार ठेवली आहेत. गांधी यांची खासदारकी तिसर्यांदा असल्याने त्यांना मंत्रीपदासाठी आणखी जास्तवेळ वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील किती खासदारांना मंत्री पद द्यायचे? यावरून गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. खासदार गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांचे मंत्रीमंडळातील स्थान पक्के आहे. त्यांच्याशिवाय महाराष्ट्रातील संभाव्य यादीत गांधी यांचा समावेश होण्याची शक्यता कमीच आहे. खासदार दिलीप गांधी हे मंत्रीपदासाठी नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, श्याम जाजू यांच्या संपर्कात आहेत. मंत्रीमंडळात रावसाहेब दानवे, हंसराज अहिर, चिंतामण वानगा, पीयूष गोयल यांच्या नावाची शिफारस महाराष्ट्रातून गेली आहे. त्यामुळे गांधी यांचा नंबर आणखी दूर गेला आहे. सेनेकडून वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात नगरचे बाळासाहेब विखे आणि भाजपाचे दिलीप गांधी मंत्री होते. त्यामुळे यंदा दोन नव्हे तर किमान एकतरी मंत्रीपद जिल्ह्याला मिळेल, अशी शक्यता भाजपाच्या वतुर्ळात आहे. मात्र गांधी यांना मंत्रीपद मिळू नये, यासाठी काही नेत्यांनी अर्बन बँक घोटाळ््याचा मुद्दा पुढे केला असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
दिलीप गांधींचे मंत्रीपद लांबणीवर?
By admin | Published: May 18, 2014 11:21 PM