बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा (जि. अहमदनगर): कुकडी प्रकल्पातील पाणी आंबेगाव, शिरुर तालुक्यात जास्तीत जास्त खेचण्यासाठी आमदार दिलीप वळसे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज दि. 11 रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली आहे. या बैठकीपासून इतर लोकप्रतिनिधी यांना दुर ठेवण्यात आले आहे.
या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचा अहवाल शासनास दोन दिवसात शासनाला पाठवावा असे नमुद करण्यात आले आहे. या बैठकीत डिंबे माणिकडोह प्रकल्प बोगदा तळपृष्ठ निश्चित होईपर्यत चतुर्थ सुधारीत विकास आखाड्यात समावेश करु नये. डिंबे धरणाखालील कळमजाई व म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनांचा कुकडी प्रकल्पात समावेश करावा, आंबेगाव, शिरुर तालुक्याचा जल नियोजनाचा वाटा कायम ठेवावा, डिंबे डावा कालवा दुरुस्तीसाठी 80 कोटीचा निधी तातडीने मंजुर करावा, आंबेगाव तालुक्यात नदीद्वारे बंधाऱ्यात कायम पाणी सोडावे या अशा मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
अहमदनगर, सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. यासाठी अनेक वर्षापासून लढा चालू आहे. यावर शासन ठोस भुमिका घेत नाही. नगर- सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकरी कुकडीच्या पाण्यासाठी आशावादी आहेत. अशा परिस्थितीत दिलीप वळसे यांनी आपल्या पोळीवर तुप ओढण्यासाठी आक्रमक भुमिका घेतली आहे. डिंबे- माणिकडोह बोगद्याचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडतील आशा निर्माण झाली असताना वळसेंनी खो देण्यास सुरुवात केली. यावर कुकडी लाभक्षेत्रातील जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि करमाळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी काय भुमिका घेतात याकडे लक्ष राहणार आहे.