श्रीगोंदा : गुजरात राज्यात भाजपाची घसरगुंडी झाल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, आमदार दिलीप वळसे यांनी केले.कुकडी साखर कारखान्यावर शुक्रवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. वळसे म्हणाले, माझ्यावर नगर, जळगाव जिल्ह्यांची जबाबदारी आहे. या दोन जिल्ह्यांत किमान १० जागा विधानसभेला मिळाल्या की राज्यात राष्ट्रवादीचे सरकार शंभर टक्के येईल. त्यासाठी आपण व्यूहरचना आखणार आहे. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा आमदार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाले, मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे मी तुम्हाला जागे करीत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले म्हणाले, भाजपाने शेतकरी मोडला आता सहकाराच्या मागे लागले आहेत. साखर कामगारांनाही आपल्या हितासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. सध्या भाजपाच्या विरोधात लाट आली आहे. त्यामुळे सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप विजयी होतील. आ. जगताप म्हणाले, मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून शेतकºयांचा अपेक्षाभंग केला. आता या सरकारला पराभूत करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत संधी येणार आहे. राष्ट्रवादीला एक नंबरचे मतदान होईल.राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुश्री गुंड, प्रा. तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, सचिन जगताप, सबाजी गायकवाड, विठ्ठलराव काकडे, अशोक बाबर, मीना आढाव, दीपक भोसले, कल्याणी लोखंडे, बाळासाहेब उगले, विश्वास थोरात, अख्तारभाई शेख, हृषीकेश गायकवाड, सुभाष काळाणे उपस्थित होते.
श्रीगोंद्यात दादा एके दादा
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आमदार राहुल जगताप यांचे नाव सोडून दुसरे नाव पक्षासमोर नाही. आ. जगताप यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सभागृह बंद पाडले होते. त्यामुळे श्रीगोंद्यात ‘राहुलदादा एके राहुल दादा’ असा उल्लेख दिलीप वळसे यांनी केला. त्यावर एकच हशा पिकला.
...तर जेलमध्ये पाठवू
श्रीगोंदा तालुक्यातील ऊस ठेवून नागवडे अथवा कुकडी साखर कारखान्याने बाहेरून कमी भावात ऊस आणला नाही, परंतु नागवडे व आमच्यावर कोणी चुकीचे आरोप केल्यास अब्रू नुकसानभरपाईचा दावा दाखल करून जेलमध्ये पाठवू, असा इशारा आमदार राहुल जगताप यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला.