अहमदनगर : रुग्णांना जास्त दर आकारणी करण्याबाबत राज्य शासनाकडे अनेक तक्रारी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जादा दर आकारणी केल्यास संबंधित खासगी रुग्णालयांवर थेट कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. तसेच नियमानुसार रुग्णालयांनी त्यांच्याकडील सेवा-सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
कोविड-१९ साथरोग नियंत्रणासाठी ज्या ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्यान्वये रुग्णालयांनी नियम पालन करणे आवश्यक आहे. बॉम्बे नर्सिंग होम दुरुस्ती अधिनियमाअंतर्गत विविध रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखाने यांच्याकडून रुग्णांकडून जास्त दर आकारणी करीत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्या रुग्णांना कोणतीही आरोग्य विमा उत्पादन किंवा कोणतेही हॉस्पिटल किंवा खासगी कॉर्पोरेटमधील करार, आरोग्य विमा संपलेल्या रुग्णांवर उपचार करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी २१ मे रोजी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत जारी केलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अधिसूचनेमधील १ ते १५ मधील तरतुदींनुसार खासगी रुग्णालयांनी अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. यामुळे आता येथून पुढे खासगी रुग्णालयांवर जिल्हाधिकारी यांचा थेट वॉच राहणार आहे.